मृतांच्या नातेवाईकांची रेल्वेकडे भरपाईची मागणी

डॉकयार्ड रेल्वे स्थानकाजवळ एक आठवडय़ापूर्वी भिंत कोसळून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर या घटनेबाबत वेगळेच सत्य बाहेर येत असून घटनास्थळी मृत्युमुखी पडलेले हे कामगार नसून पादचारी असल्याचे पुढे येत आहे. नसरीन बरकत माद्रे (५२) व गणेश जाबरे (४७) अशी मृतांची नावे असून त्यांची कुटुंबे सध्या जबर धक्क्यात आहेत. कुटुंबीयांनी पुढे येत आपल्या नातलगांना न्याय मिळवून देण्याची मागणी रेल्वेकडे केली आहे.

डॉकयार्ड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला २४ फेब्रुवारीला सायंकाळी स्थानकाची संरक्षक भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू ओढवला. अपघातानंतर महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण विभागाने रात्री उशिरा मृत्यू ओढवलेले दोघेही भिंतीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे कामगार होते, अशी माहिती दिली. मात्र मृत्युमुखी पडलेले हे कामगार नसून पादचारी होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी आता दिली आहे. मृत्युमुखी पडलेले गणेश जाबरे व नसरीन माद्रे हे दोघेही डॉकयार्ड रेल्वे स्थानकाजवळील संरक्षक भिंतीलगत असलेल्या पदपथावरून जात असताना ही भिंत कोसळली व त्याखाली येऊन त्यांचा मृत्यू ओढवला.

भिंत रेल्वेची की पालिकेची?

स्थानकाजवळची ही संरक्षक भिंत पाडण्याचे काम चालू असल्याचे समजत असून, रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचे कामही येथे चालू होते. मात्र काम चालू असताना ठेकेदाराने कोणेतेही सुरक्षा उपाय केले नसल्याचे पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात नमूद केले. सध्या ही भिंत रेल्वेची की महापालिकेची, असा संभ्रम निर्माण झाला असून मृतांच्या नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे ही रेल्वेची भिंत आहे. याप्रकरणी रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी, प्रथमत: ही भिंत रेल्वेची असल्याचे समजत असून याबाबत ठोस माहिती घेऊनच अधिक बोलू असे सांगितले. तर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

समाजकार्यासाठी जाताना मृत्यू..

डॉकयार्ड येथील आरएसएम अ‍ॅस्टय़ुट कन्स्लटिंग या खासगी कंपनीत लेखापाल म्हणून काम करणारे गणेश जाबरे हे दर बुधवारी सायंकाळी त्यांच्या कुणबी समाज उन्नती संघात काम करण्यानिमित्त जात असत. अपघाताच्या या संस्थेत जाताना अपघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांचा मुलगा सुशांत जाबरेने सांगितले. आमच्या सायन येथील घरी वयोवृद्ध आजी-आजोबा, आई व आम्ही शिक्षण घेणारी दोन भावंडे असे कुटुंब असून माझे वडील हे घराच्या गृहकर्जाचे हफ्ते फेडत होते. आता घरची जबाबदारी व खर्च कसा पेलणार याची चिंता सुशांतने बोलून दाखविली. त्यामुळे रेल्वेच्या हद्दीतील ही भिंत असून माझ्या आईला रेल्वेत नोकरी व आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्याने केली.

मुलगी अनाथ झाली

कुर्ला येथे राहणारी नसरीन माद्रे हिचे पती निवर्तले असून तिला १३ वर्षांची लमीझ ही एक मुलगी आहे. ती आता अनाथ झाल्याचे भावुकपणे नसरीनचे भाचे फैजल माद्रे यांनी सांगितले. नसरीन नातेवाईकांना भेटण्यासाठी डॉकयार्ड येथे आल्या होत्या, तेथून परतत असताना हा अपघात झाला असून रेल्वेच्या हद्दीतील ही घटना आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येऊन रेल्वेने भरपाई देण्याची मागणी फैजल यांनी केली.