प्राण्यांच्या मलमूत्रामुळे दूषित झालेल्या पाण्यातून पसरणाऱ्या लेप्टोमुळे ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ात दोघांचा मृत्यू झाला आहे. जुलैमध्येही या आजाराने एकाचा बळी घेतला होता. पालिका रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे कावीळ, हिवताप आणि अतिसाराच्या रुग्णांची संख्याही या महिन्यात साडेसातशेवर गेली आहे.
धारावी येथील २२ वर्षिय तरुणाचा ९ ऑगस्ट रोजी तर अंधेरी येथील १८ वर्षिय तरुणाचा १२ ऑगस्ट रोजी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात लेप्टोमुळे मृत्यू झाला. २५ जुलै रोजी धारावीतील २५ वर्षांच्या तरुणाचा लेप्टोमुळे मृत्यू झाला. लेप्टोस्पायरोसिस हा आजार लेप्टोस्पायराजीवाणूमुळे होतो. प्राण्यांच्या मूत्राने दूषित झालेल्या पाण्यातून हा आजार पसरतो. साधारण दहा दिवसांच्या अवधीनंतर सुका खोकला, डोकेदुखी, मळमळ आणि हुडहुडी भरून ताप अशी आजाराची लक्षणे दिसू लागतात.
डेंग्यू या डासांमुळे पसरणाऱ्या आजाराचे रुग्णही गेल्या आठवडय़ात वाढले आहेत. १३ ते १९ ऑगस्ट या काळात पालिका रुग्णालयात डेंग्यूचे १६ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या एकूण रुग्णांची संख्या ३३ झाली आहे. कावीळग्रस्त रुग्णांची संख्याही जुलै महिन्याच्या तुलनेत अधिक झाली आहे. हिवतापाचे ७२८, तर पोटदुखीमुळे त्रस्त असलेले ७१७ रुग्ण ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत उपचारांसाठी आले. शहरातील सुमारे ७० टक्के नागरिक पालिका रुग्णालयात जात नाहीत. त्यामुळे रुग्णांची नेमकी संख्या दुपटीहून अधिक असण्याची शक्यता आहे.