घाटकोपर (प.) येथील सवरेदय रुग्णालयाजवळील युनिव्हर्सल मिल कम्पाऊंडमधील गोदामाला शनिवारी पहाटे भीषण आग लागली होती. या आगीत गोदाम भस्मसात झाले असून आग विझविताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला. जखमी जवानाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सवरेदय रुग्णालयाजवळ असलेल्या युनिव्हर्सल मिल कम्पाऊंडमधील गोदामाला शनिवारी पहाटे ६.४५ च्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी रवाना झाले. काही क्षणांतच आगीने गोदामाला वेढले. धुराचे लोट रेल्वे स्थानक परिसरातही पसरले होते. गोदामाला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. तब्बल साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आग विझविताना अग्निशमन दलातील जवान भागवंत निकम (३५) जखमी झाले. त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोदामाला लागलेली आग सकाळी १०.१७ च्या सुमारास विझल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातून देण्यात आली.