मुंबईः शहरामध्ये बॉम्बस्फोटाच्या धमक्याचे सत्र सुरूच असून अमेरिकन वकिलाती पाठोपाठ आता गोवंडी व कांदिवली येथील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बस्फोट घडवून आण्याचे ई-मेल प्राप्त झाले आहेत. पोलिसांनी या घटन गांभीर्याने घेतल्या असून तीन विविध पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे.

कांदिवलीतील आंतरराष्ट्रीय शाळेला धमकी

कांदिवली पूर्व परिसरातील ठाकूर कॉम्प्लेक्स येथील रायन आंतरराष्ट्रीय शाळेत बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा ई-मेल शनिवारी प्राप्त झाला होता. याप्रकरणी समता नगर पोलीसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात धमकी देऊन भीती निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. धमकीमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले आहे. आरोपीने त्यासाठी दिवीज प्रभाकर लक्ष्मी नावाच्या ई-मेल आयडी तयार केला होता. तो ई-मेल आयडी वापरणाऱ्या व्यक्तीचा तंत्रज्ञानाच्या मदतीन पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणामागे खोडसाळपणा असल्याचा पोलिसांना संशय आहे.

गोवंडीतील आंतरराष्ट्रीय शाळेला धमकी

कांदिवलीपाठोपाठ गोवंडी येथील कनकिया आंतरराष्ट्रीय शाळेलाही बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. तेथेही दिवीज प्रभाकर लक्ष्मी नावाच्या व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांमध्ये एकाच व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय आहे. याप्रकरणी रविवारी देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक शांतता भंग करून भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी खोटी धमकी दिल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांची गुन्हे शाखाही याप्रकरणी समांतर तपास करीत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकन वकिलातीला धमकीचा दूरध्वनी

मुंबईतील बीकेसी येथील अमेरिकन वाणिज्य वकिलातीलाही धमकीचा दूरध्वनी आला होता. एका अज्ञात व्यक्तीने शनिवारी रात्री ८ च्या सुमारास दूरध्वनी करून अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली होती, असे बीकेसी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना सतर्क करण्यात आले आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसरात शोध घेण्यात आला. मात्र काहीही संशयास्पद सापडले नाही. या प्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमाअंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.