मुंबई : दादर पश्चिम येथे एका भरधाव मोटरीने झाडाला धडक दिली. या अपघातात मोटारीतील दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी घडली. चालकाविरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक मद्याच्या अमलाखाली होता का, याबाबत वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होऊ शकेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
सुनील दत्तवानी (२९) आणि सतीश यादव (३१) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. केविन पिल्लई (३८) आणि साद इक्बाल अन्सारी (३७) गंभीर जखमी झाले आहेत. अन्सारी हे हिंदूजा रुग्णालयात कृत्रिम श्वसन यंत्रणेवर आहेत, तर पिल्लई गंभीर जखमी असून त्याच्यावर वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांचा पाचवा मित्र आणि मोटार चालक सुदर्शन झिंजुरटे जखमी असून हिंदूजा रुग्णालयात दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचही मित्र लोअर परळ येथील एका पबमध्ये गेले होते आणि मेजवानीनंतर ते झिंजुरटे यांच्या मोटारीतून घरी निघाले होते. चालक मद्य प्राशन करून गाडी चालवत असल्याचा संशय असून वैद्यकीय चाचणीनंतर ते स्पष्ट होईल.



