Mumbai Crime News Goregaon Murder Update: गैरसमजातून मित्राची हत्या केल्याचा एक विचित्र गुन्हा मुंबईत उघडकीस आला आहे. ३५ वर्षीय व्यक्तीची त्याच्याच दोन मित्रांनी दगडाने ठेचून हत्या केली. यानंतर दोन्ही आरोपींनी मुंबईतून आपल्या गावी पळ काढला होता. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या चौकशीतून या गुन्ह्यामागचे धक्कादायक कारण समोर आले. मासे खाल्ले म्हणून ज्या मित्राला संपवलं, त्याने मासे खाल्लेच नसल्याचे सखोल तपासातून उघड झाले आहे.
मुंबईतील वनराई पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली. मृत व्यक्तीचे नाव अफसर आहे. तो सुरेश आणि राजेश रमेशनाथ ऊर्फ नेपाळी यांच्याबरोबर मुंबईतील गोरेगाव येथे राहण्यास होता. गुन्हा घडला त्यादिवशी तिघांनी मद्य प्यायले होते. तसेच त्यांनी मासे खाण्याचा बेत केला होता. यासाठी बाजारातून मासेही आणले होते.
मद्यपान करता करता मासे तळल्यानंतर तिघेही मित्र झोपी गेले. थोड्या वेळाने सुरेश आणि राजेश जेवणासाठी असता, पॅनवरील तळलेले मासे गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अफसर मासे खाऊन झोपला असावा, असा संशय आल्यामुळे त्यांनी अफसरला झोपेतून उठवले. यानंतर तिघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर राजेश आणि सुरेश यांनी अफसरला दगडाने ठेचून मारून टाकले.
गुन्ह्यानंतर दोघेही आरोपी हरियाणाला पळून गेले. यासंबंधी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींची शोध सुरू केला. मृत व्यक्ती आणि आरोपी भंगार वेचण्याचे काम करत होते. सुरेश हरियाणाचा तर राजेश नेपाळचा रहिवासी आहे.
पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींकडे मोबाइल नव्हता किंवा त्यांचे ओळखपत्रही नव्हते. त्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण काम होते. परिसरातील कचरा वेचणाऱ्या ५० लोकांशी विचारपूस केल्यानंतर आरोपींचा थांगपत्ता मिळू शकला. पोलिसांनी सुरेशला हरियाणातून तर राजेशला रेल्वे स्थानकावरून अटक केली.
उंदीर मासे खाऊन गेला
दरम्यान चौकशी केल्यानंतर एक वेगळेच सत्य समोर आले. अफसरने मासे खाल्ले म्हणून त्याची हत्या करण्यात आली. मात्र मासे उंदीर खाऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. उंदीर मासे खाऊन गेल्यानंतर अफसरवर संशय घेऊन त्याचा नाहक बळी गेला. पोलिसांच्या चौकशीत राजेश ऊर्फ नेपाळी अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आले.
