मुंबईः वर्सोवा समुद्रकिनारी सोमवारी आलीशान मोटरगाडीने दोघांना चिरडले. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा व्यक्ती जखमी झाली आहे. याप्रकरणी चालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून दोघांनी मद्यसेवन केले होते का याची तपासणी करण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी तपासणीसाठी पाठवले आहेत. सागर कुटीर परिसरात राहणारे गणेश यादव (३६) अंधेरी-वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर झोपले होते. यादव हे व्यवसायाने रिक्षा चालक आहेत. त्यांच्यासोबत बबलू श्रीवास्तव हे देखील समुद्र किनारी झोपले होते. या अपघातात गणेश यांचा मृत्यू झाला आहे. श्रीवास्तव यांनी या प्रकाराची पोलिसांत तक्रार दिली. श्रीवास्तव व यादव समुद्र किनारी झोपले होते. त्यावेळी डोक्याला मार लागल्यामुळे श्रीवास्तव यांना जाग आली. तेव्हा त्यांना जवळच झोपलेल्या यादव यांच्या अंगावरून एक मोटार जात असल्याचे दिसले. त्या गाडीतून दोघे खाली उतरले. यादव हे जखमी झाल्याचे पाहून गाडीतून उतरलेल्या दोघांनी तेथून पलायन केले. त्यानंतर गणेश यांचे भाऊ बजरंगी यादव यांनी गणेश यादव आणि श्रीवास्तव यांना तातडीने रिक्षातून कूपर रुग्णालयात नेले. पण तिथे डॉक्टरांनी गणेश यादव यांना मृत घोषित केले. श्रीवास्तव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला व त्यांचा शोध सुरू केला. काही तासांच्या शोधानंतर, पोलिसांनी नागपूर शहरातील रहिवासी असलेले निखिल दिलीप जावटे (३४) आणि नवी मुंबईतील ऐरोली येथील रहिवासी शुभम अशोक डुंबरे (३३) यांना अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार यांनी सांगितले. हेही वाचा - दिवा-सीएसएमटी लोकलसाठी प्रवाशांचे आंदोलन, कोकणातील रेल्वेगाड्यांना दिवा येथे थांबा द्या हेही वाचा - ‘आरटीई’ प्रवेश, वाढीव जागांबाबतचा निकाल सगळ्या शिक्षण मंडळांना लागू, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती आरोपी किनाऱ्यावर गाडी चालवत होते आणि तिथे लोक झोपले असल्याचे त्यांना माहीत होते. तरीही, ते घटनास्थळावरून पळून गेले. आम्ही त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले असून अपघातावेळी त्यांनी मद्यसेवन केले होते का, हे तपासणीसाठी पाठवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०५ (मनुष्यवधाचा गुन्हा), १२५ अ (गंभीर दुखापत करणारे निष्काळजीपणा),२३९ (गुन्ह्याची माहिती देण्याचे कर्तव्य असलेल्या व्यक्तीने माहिती न दिल्याचा गुन्हा), २८१ (सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे वाहन चालवणे), ३(५) (सामान्य हेतू), आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४ अ (जखमी व्यक्तीला वैद्यकीय उपचार मिळवण्यासाठी कोणतेही पाऊल न उचलणे) आणि १३४ ब (जखमींना मदत करण्यासाठी पोलिसांना माहिती न देणे) या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले.