मुंबई : वडाळा- ठाणे- कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामादरम्यान झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) डीबी- एचआयएलएल- एलबीजी या सल्लागार कंपनीची हकालपट्टी केली. तसेच तातडीने सल्लागाराचे कंत्राट रद्द करण्यासह त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले. त्याच वेळी कार्यकारी अभियंत्याला निलंबित केल्यानंतर आणखी दोन अधिकार्यांना निलंबित करण्यात आले.
अधीक्षक अभियंता आणि उपअभियंत्याचा यात समावेश असून मुख्य अभियंत्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशांनंतर एमएमआरडीएकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या शनिवारी (१४ फेब्रुवारी) मुलुंड, एलबीएस रोड येथे मेट्रो ४ मार्गिकेच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. यात एकाचा मृत्यू झाला, तर तीन जखमींपैकी एकाची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. या दुर्घटनेनंतर मुलुंड पोलिसांनी मेट्रो ४ मार्गिकेतील टप्पा सी-१० च्या कामाची जबाबदारी असणार्या कंत्राटदार मेसर्स आरएजेव्ही-मिलन कंपनीच्या चार अधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तर या मार्गिकेची सल्लागार कंपनी म्हणून काम करणार्या डीबी- एचआयएलएल- एलबीजी कंपनीच्या एका अधिकार्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाचही जणांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली असून त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सल्लागार कंपनीची हकालपट्टी केल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली. दरम्यान, सल्लागार कंपनीपैकी एक एलबीजी म्हणजे लुईस बर्जर ही कंपनी वादग्रस्त असून या कंपनीविरोधात मोनोरेल प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याचे ताशेरे कॅगने ओढले होते. या कंपनीविरोधात असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या अनुषंगाने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१५ मध्ये चौकशीची मागणी केली होती. पण पुढे याच कंपनीला मेट्रो सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले.
याच कंपनीच्या हलगर्जीमुळे शनिवारी एकाचा बळी गेल्याचा आरोप होत होता. त्यानुसार अखेर सोमवारी सल्लागाराचे कंत्राट रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच वेळी शनिवारी कार्यकारी अभियंता सत्यजीत साळवी यांना निलंबित करण्यात आले होते. आता अधीक्षक अभियंता अभिजीत भिशीकर आणि उपअभियंता स्नेहल सावंत यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याच वेळी मुख्य अभियंता मधुकर खरात यांची विभागीय चौकशी सुरू केल्याचेही सूत्रांनी सांगितले.
लवकरच एमएमआरडीएमध्ये दक्षता विभाग
या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता एमएमआरडीएत स्वतंत्र दक्षता विभागाची स्थापना केली जाणार आहे. हा दक्षता विभाग प्रत्येक प्रकल्पस्थळी सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी करणार आहे.
मृताच्या नातेवाईकांना ४५ लाख
मुलुंड मेट्रो अपघातात ठार झालेल्या रामधनी यादव यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांच्या नातेवाईकांनी नकार दिला होता. तसेच दोन कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली होती. मात्र आता मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला असून ते पार्थिव विमानाने रामधनी यादव यांच्या मूळ गावी नेण्यात आले आहे. दरम्यान, रामधनी यादव यांच्या नातेवाईकास एमएमआरडीएकडून एकूण ४० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर पाच लाख रुपये हवाई प्रवास आणि इतर खर्चापोटी देण्यात आले आहेत. जखमींपैकी एक राजकुमार यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर महेंद्र यादव यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दंडाची रक्कम वाढविण्याचे आदेश
सल्लागार कंपनीला या अपघातप्रकरणी एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र हा दंड खूपच कमी असल्याचे म्हणत दंडाची रक्कम वाढवा, त्यांची जबाबदारी निश्चित करा, असे आदेश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला दिले आहेत. त्यामुळे कंत्राट रद्द केल्यानंतर, काळ्या यादीत टाकल्यानंतर सल्लागार कंपनीविरोधात दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.

