मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या चार रेल्वेगाड्यांपैकी दोन रेल्वेगाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.कोकण रेल्वेवरील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रमुख रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे या स्थानकांवर प्रमुख रेल्वेगाड्यांना थांबा देणे शक्य होत नव्हते. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन हिसार – कोयंबतूर एक्स्प्रेस, गांधीधाम – नागरकोइल एक्स्प्रेस या रेल्वेगाडीच्या दोन्ही दिशेकडील प्रवासाला कणकवली रेल्वे स्थानकात थांबा देण्यात येईल. तर, एर्नाकुलम जंक्शन-अजमेर एक्स्प्रेस, एर्नाकुलम जं. – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस या रेल्वेगाडीला सिंधुदुर्ग येथे थांबा देण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कणकवली, सिंधुदुर्ग स्थानकांवर रेल्वेगाड्यांना प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक १२९७७ एर्नाकुलम जंक्शन – अजमेर एक्स्प्रेसला सिंधुदुर्ग येथे २ नोव्हेंबरपासून थांबा देण्यास सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग स्थानकात दुपारी १२.३२ वाजता ही रेल्वेगाडी दोन मिनिटे थांबेल. त्यानंतर पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल. गाडी क्रमांक १२९७८ अजमेर – एर्नाकुलम एक्स्प्रेसला सिंधुदुर्ग स्थानकात ७ नोव्हेंबरपासून थांबा देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग स्थानकात सकाळी ११.४६ वाजता ही रेल्वेगाडी दोन मिनिटे थांबेल.
गाडी क्रमांक २२६५५ एर्नाकुलम जं. – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसला सिंधुदुर्ग येथे ५ नोव्हेंबरपासून थांबा देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग स्थानकात सायंकाळी ७.०८ वाजता ही रेल्वेगाडी दोन मिनिटे थांबेल. गाडी क्रमांक २२६५६ हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्स्प्रेसला सिंधुदुर्ग स्थानकात ७ नोव्हेंबरपासून थांबा देण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी सिंधुदुर्ग स्थानकात सकाळी ७.२० वाजता दोन मिनिटे थांबेल.
गाडी क्रमांक २२४७५ हिसार-कोयंबतूर एक्सप्रेसला कणकवली येथे ५ नोव्हेंबरपासून रात्री ९.४६ वाजता थांबा देण्यात येईल. ही रेल्वेगाडी रात्री ९.४८ वाजता पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल. गाडी क्रमांक २२४७६ कोयंबतूर-हिसार एक्सप्रेसला कणकवली येथे ८ नोव्हेंबरपासून सकाळी ६.३० वाजता थांबा देण्यात येईल. ही रेल्वेगाडी सकाळी ६.३२ वाजता पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.
गाडी क्रमांक १६३३५ गांधीधाम-नागरकोइल एक्सप्रेसला कणकवली येथे ७ नोव्हेंबरपासून पहाटे ५.४५ वाजता थांबा देण्यात येईल. ही रेल्वेगाडी सकाळी ६.३२ वाजता पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल. गाडी क्रमांक १६३३६ नागरकोइल- गांधीधाम एक्सप्रेसला कणकवली येथे ११ नोव्हेंबरपासून दुपारी २ वाजता थांबा देण्यात येईल. ही रेल्वेगाडी दुपारी २.०२ वाजता पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.
