मुंबई : अंधेरीतील एका दुकानामध्ये चोरी केल्याप्रकरणी अधेरी पोलिसांनी दोघांना अटक केली. आरोपींकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सिद्धेश रघुनाथ पाटील आणि विकास ब्रिजेश मिश्रा, अशी या दोघांची नावे आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत नऊ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मालाड येथे राहणारे व्यापारी कृषिक रमेश गाला यांचे अंधेरीतील कृष्णा कंपाउंडमध्ये एक दुकान आहे. दिवसभरातील काम संपल्यावर ३१ जानेवारी रोजी ते घरी निघून गेले. रात्री उशिरा त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी सुमारे दोन लाख रुपयांच्या वस्तूंची चोरी केली. दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संताजी घोरपडे, पोलीस निरीक्षक शिवाजी पावडे यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण आणि तांत्रिक माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे, पोलीस अंमलदार राजू पेडणेकर, सूर्यवंशी, लोंढे, जाधव, सोनजे, कापसे, मोरे यांनी अंधेरी परिसरातून सिद्देश पाटील आणि विकास मिश्रा या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी ही चोरी केल्याची कबुली दिली. या दोघांनी चोरलेला सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
हेही वाचा – मुंबई: घरफोडीच्या गुन्ह्यांत दोन आरोपी अटकेत
सिद्धेश सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या अटकेने चोरीसह घरफोडीच्या अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.