गेल्या चोवीस तासांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. मानखुर्द पश्चिमेकडील लल्लूभाई कम्पाऊंड येथे सोमवारी रात्री इमारतीच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळून दोघे जखमी झाले. देवराज कूपन (४८) आणि अमोल गजधने (४३) अशी जखमींची नावे असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहर भागात २, पूर्व उपनगरात १ तर पश्चिम उपनगरात ३ ठिकाणी पडझड झाल्याच्या घटनांची तक्रार पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे आली. मुंबईत नऊ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या दुर्घटना घडल्या. तर २१ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्याच्या तक्रारी आल्या.

दरम्यान,  गेल्या चोवीस तासांत पश्चिम उपनगरात सर्वाधिक ९७.११ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर शहर भागात ५१.३५ मि.मी., पूर्व उपनगरात  ७६.१८ मि.मी. पाऊस पडला. मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल. तर काही ठीकाणी अतिजोरदार ते मुसळधार पाऊस पडण्यायची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

आज दिवसभरात भरती आणि लाटांची उंची

सकाळी:- ०९:५४ वाजता – ०४.०३ मीटर 

रात्री:- ०९:३८ वाजता – ३.४९ मीटर

ओहोटी:- दुपारी :-  ०३:४७ वाजता – २.१३ मीटर