मुंबईः अंधेरी पश्चिम येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत देशी कट्ट्यांसह दोन आरोपींना सोमवारी पहाटे अटक केली. आरोपींकडून दोन जिवंत काडतुसही सापडले आहे. याप्रकरणी अंधेरी येथील डीएन नगर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान गुजर व सचिन कुशवाह अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही मूळचे राजस्थान येथील रहिवासी असून सध्या मालाड येथील मालवणी परिसरात राहत होते. गुजर हा रिक्षा चालक असून कुशवाह ह हा देखील चालक म्हणून काम करतो.
दोन व्यक्ती शस्त्रांसह येणार असल्याची माहिती डीएन नगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अंधेरी पश्चिम येथील वृंदावन गुरूकुल येथील पदपथावर सापळा रचण्यात आला होता. दोन संशयीत रात्री पावणे अकराच्या सुमारास आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे दोन देशी कट्टे व दोन जिवंत काडतुसे सापडली. त्यानंतर दोघांविरोधातही हत्यार बंदी कायदयांतर्गत गुन्हा दाखल करून सोमवारी पहाटे दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. आरोपींकडे सापडलेल्या देशी कट्ट्यांबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.