scorecardresearch

चोरीच्या ट्रकसह दोन जण वाहतूक पोलिसांच्या ताब्यात

चौकशीत हा ट्रक चोरीचा असल्याचे समोर आले असून भिवंडीतील एका गोळीबार प्रकरणात देखील यातील आरोपींची समावेश आहे.

चोरीच्या ट्रकसह दोन जण वाहतूक पोलिसांच्या ताब्यात
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

मुंबई – सिग्नल तोडून पळ काढणाऱ्या एका ट्रकसह दोघांना शुक्रवारी पहाटे मानखुर्द वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत हा ट्रक चोरीचा असल्याचे समोर आले असून भिवंडीतील एका गोळीबार प्रकरणात देखील यातील आरोपींची समावेश आहे.

मानखुर्द- घाटकोपर जोडरस्त्यावरून हा ट्रक शुक्रवारी पहाटे नवीमुंबईच्या दिशेने जात होता. मानखुर्द टी जंक्शन येथे हा ट्रक येताच, सिग्नल तोडून तो नवीमुंबईच्या दिशेने भरधाव वेगात पळू लागला. तेथे कर्तव्यावर असलेल्या मानखुर्द वाहतूक पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ ट्रकचा पाठलाग केला. त्यानंतर काही अंतरावर जाऊन पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेतला. यावेळी ट्रक मध्ये चालक आणि त्याचा एक साथीदार होता. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अधिक चौकशीनंतर हा ट्रक महाड येथून चोरल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली.

काही दिवसांपूर्वी भिवंडी परिसरात एका टेम्पो चालकाला याच आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली. भिवंडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून मानखुर्द वाहतूक पोलिसांनी त्याबाबत भिवंडी पोलिसांना माहिती दिली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two persons with stolen truck in custody of traffic police mumbai print news zws

ताज्या बातम्या