प्रवासी रिक्षाचा परवाना नाही; फसवणुकीचा गुन्हा दाखल

विरार : नालासोपारा पूर्वेकडील बाप्पा सीताराम मार्केट, सागर स्वीटजवळ एकाच क्रमांकाच्या बनावट नंबर प्लेट तयार करून प्रवासी भाड्याकरिता वापरत असलेल्या रिक्षाचालकास तुळिंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील बाप्पा सीताराम मार्केट, सागर स्वीटजवळ वाहतूक पोलीस हवालदार राजू शंकर गायकवाड वाहतूक कोंडी सोडवत असताना त्यांना एकाच क्रमांकाच्या दोन प्रवासी रिक्षा (क्रमांक एमएच ४८ ए ७९११) आढळून आल्याने त्यांना संशय आला. त्यांनी दोन्ही रिक्षाचालकांना थांबवून तात्काळ पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधव यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी केली असता मूळ प्रवासी रिक्षा क्रमांक एमएच ४७ डी ५१४६ ऐवजी क्रमांक एमएच ४८ ए ७ ९ ११ हा बनावट क्रमांक लावून ती त्याच क्रमांकाची रिक्षा असल्याचे भासवून मागील तीन महिन्यांपासून प्रवासी भाड्याकरिता वापरत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच रिक्षा चालकाकडे प्रवासी रिक्षा चालवण्याचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता. राजू शंकर गायकवाड यांनी तुळिंज पोलीस ठाण्यात लक्ष्मण सुनदेय हातकर, दीनानाथ रमाशंकर यादव यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात हे करीत आहेत.