– पावणेतीन कोटींच्या हिऱ्यांची चोरी
मुंबई : दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करून चौघांनी पावणेतीन कोटी रुपयांच्या हिऱ्यांच्या दागिन्यांसह व्यापारी व त्याच्या कर्मचाऱ्याचे शीव परिसरातून अपहरण केले होते. याप्रकरणी राजस्थानवरून आता दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपींकडून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला इनोव्हा गाडीत बसवून भिवंडी येथे नेले आणि तेथे मारहाण करून त्याच्या ताब्यातील हिऱ्यांचे दागिने व रोख असा दोन कोटी ६२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला होता.
हेही वाचा >>> Apple WWDC 2023 Live: iOS 17 अपडेटमध्ये मिळणार कॉन्टॅक्ट पोस्टर फिचर, महत्वाच्या अपडेट्स एकाच क्लिकवर




तक्रारदार हरिराम घोटिया (३१) मूळचे राजस्थान येथील नागौर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. घोटिया सध्या हैदराबाद येथे दागिने घडवण्याचे काम करतात. घोटिया त्यांचे मालक संतोष नारेडी यांच्यासोबत सोन्याचे २० लगड, पाच हिरे जडीत नेकलेस, तीन हिरेजडीत कर्णफुले, तीन हिरेजडीत ब्रेसलेट, दोन हिरेजडीत अंगठ्या, एक सोनसाखळी, दोन हजारांच्या १,३५० नोटा (२७ लाख रुपये) अशी एकूण दोन कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता घेऊन ३१ मे रोजी मुंबईत आले होते. सहकारी प्रशांत चौधरी व मालक संतोष नरेडी यांच्यासोबत घोटिया यांना कामानिमित्त बीकेसी येथे जायचे होते. त्यासाठी ते शीव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हायवे अपार्टमेंट येथील बस थांब्यावर थांबले होते. त्यावेळी चार व्यक्ती इनोव्हामधून तेथे आल्या व त्यांनी ओळखपत्र दाखवून आपण दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर घोटिया व त्यांचे मालक संतोष यांना आपल्यासोबत यावे लागेल, असे सांगितले. आरोपींनी दोघांनाही दिल्लीला घेऊन जात असल्याचे सांगितले. दोघांना मोटरगाडीत बसवून भिवंडी येथे नेण्यात आले. आरोपींनी तेथे निर्जनस्थळी नेऊन घोटिया यांच्याकडील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार करणाऱ्या घोटिया यांना आरोपींनी मारहाण केली आणि त्यांच्याजवळील दागिने हिसकावले. त्यानंतर घोटिया व संतोष यांना तेथेच सोडून आरोपींनी गाडीतून पलायन केले. घोटिया यांनी याप्रकरणी शीव पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी तोतयागिरी, जबरी चोरी व अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा >>> दहिसर भाईंदर जोडरस्त्याच्या निविदेला पाचव्यांदा मुदतवाढ; निविदेला प्रतिसाद मिळेना
याप्रकरणी शीव पोलिसांचे एक पथक राजस्थानला रवाना झाले होते. त्यांनी राजस्थान-बिकानेर रस्ता येथील देराजसर येथून महेंद्र व मनोज या दोन संशयीतांना ताब्यात घेतले. या दोघांनी किशननाथ व अशोक या दोन आरोपींच्या मदतीने हा गुन्हा केल्याची माहिती उघड झाली आहे. मनोज व महेंद्र यांच्याकडून एक कोटी १० लाख रुपयांचे दागिने, एक किलो सोन्याची लगड व १८ लाख रुपये हस्तगत करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.