केंद्रात भाजपप्रणीत आघाडीचे सरकार येण्याची चाहूल लागताच भाजपमधून विजयाची जोरदार तयारी सुरू आहे. १६मेच्या दिवशी निकालाचा आनंद साजरा करण्यासाठी राज्यभरातून मिठाया, फटाके, रोषणाई, बॅण्डबाजे यांच्या ‘ऑर्डर’ दिल्या जात आहेत. तर दक्षिण मुंबईतील पाच ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी मिठाईचे वाटप करण्याचे ठरवले असून त्यासाठी दोन हजार किलो बुंदीचे लाडू तसेच अन्य मिठाया बनवण्याचे कामही जोरात सुरू आहे.
गिरगावमधील ‘गणेश भांडार’ यांच्याकडे सुमारे २५ ते ३० हजार बुंदीचे लाडू बनविण्याचे काम देण्यात आले आहे. त्याच्या जोडीला मालपोहा आणि काजूकतलीची ऑर्डरही देण्यात आली असल्याचे भाजपचे प्रवक्तेअतुल शहा यांनी सांगितले. त्याचबरोबर १० किलोचा कमळाच्या आकाराचा केकही कापला जाणार आहे. ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांच्या दणदणाटात विजय साजरा करणार असल्याची माहिती शहा यांनी दिली. १५ मे रोजी सीपी टँक येथे नरेंद्र मोदी यांच्या मुलाखती, त्यांच्या आईची मुलाखत एलसीडीवरून दाखविल्या जाणार आहेत. १६ मे रोजी नागपाडा, कस्तुरबा गांधी चौक, कामाठीपुरा, उमरखाडी या ठिकाणी निकाल पाहण्याची सोय केली जाणार आहे.