अल्पवयीन मुलीच्या कौमार्याचा दीड लाखांत सौदा करणाऱ्या दोन महिलांना मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने गोरेगाव (प.) येथून रंगेहाथ पकडले आहे. आरोपींपैकी एक महिला आपण या अल्पवयीन मुलीची मावशी असल्याचे पोलिसांना सांगत असून पश्चिम बंगाल येथे राहणाऱ्या या मुलीला मुंबईत कसे आणले याचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे शहरात अल्पवयीन मुलींच्या कौमार्याचा सर्रास सुरू असलेला व्यापार उघडकीस आला आहे.

गोरेगाव (प.) येथील राम मंदिर मार्गावरील एका इमारतीत १२ ते १३ वर्षांच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्यासाठी आणण्यात येत असल्याची माहिती बुधवारी सायंकाळी समाजसेवा शाखेला मिळाली. त्यानुसार, शाखेचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले.  पोलिसांनी बनावट ग्राहक म्हणून प्रवेश करत मुलीची चौकशी केली. त्यावेळी इमारतीमधील असमा तारा (३३) हिने अल्पवयीन मुलीसाठी एक लाख ८० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तडजोडीनंतर, ही रक्कम दीड लाख रुपये इतकी ठरली. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलीला घेऊन एक महिला आली. त्याचक्षणी, पोलिसांनी छापा मारत दोन्ही महिलांना ताब्यात घेत अल्पवयीन मुलीची सुटका केली.

पीडित मुलगी आपली भाची असल्याचा दावा ती महिला करत असून पोलीस तिच्या दाव्यातील सत्यता पडताळून पाहात आहे. अल्पवयीन मुलीला संगोपनासाठी डोंगरीच्या बालगृहात पाठविण्यात आले असून दोन्ही महिलांवर गुन्हा दाखल करून गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. समाजसेवा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाराजी रेपाळे यांच्यासह निरीक्षक कदम, मयेकर यांच्या पथकाने मुलीची सुटका केली.