मुंबई: भीक मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून मोबाइल चोरणाऱ्या दोन महिलांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली. या आरोपी महिलांच्या ताब्यातून पोलिसांनी आठ मोबाइल हस्तगत केले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. घाटकोपरच्या भटवाडी परिसरात राहणारे गोकुळ शिंदे यांच्या घरात ३० मार्च रोजी अज्ञात महिलांनी प्रवेश केला आणि घरातून ९० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल लंपास केले. याप्रकरणी शिंदे यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील काही सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासले असता परिसरात दोन महिला संशयास्पदरित्या फिरताना दिसल्या. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला.

त्या विद्याविहार परिसरातील पदपथावर राहत असल्याचे पोलिसांना समजले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघींना ताब्यात घेतले.दिव्या पवार (२२) आणि सीमा पवार (२०) अशी या महिलांची नावे असून दोघीही मूळच्या संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. तपासात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण आठ मोबाइल हस्तगत केले. हे मोबाइल गोरेगाव, साकीनाका आणि घाटकोपर परिसरातून चोरल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी दिव्या आणी सीमाला अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.