मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी आता उबर ॲपवरून रेल्वे तिकीटही आरक्षित करता येणार आहे. ‘उबर’ने भारतातील आघाडीच्या ऑनलाइन ट्रॅव्हलपैकी एक असलेल्या ‘इक्सिगो’सोबत भागीदारी करत ॲपवर ‘ट्रेन तिकीट बुकिंग’ सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे रेल्वे तिकीट आरक्षण, पीएनआरची स्थिती तपासणे व रेल्वे स्थानकापर्यंत; तसेच स्थानकावरून पुढील प्रवासासाठी उबर आरक्षित करणे या सुविधा एकाच ॲपवर उपलब्ध होतील.
भारतातील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे हे प्रमुख वाहतुकीचे साधन असून, २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेने ७४१ कोटी प्रवाशांची वाहतूक केली. वाढत्या ऑनलाइन रेल्वे तिकीट आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उबर व इक्सिगो यांनी भागीदारी केली आहे. या सुविधेसाठी इक्सिगोचे रेल्वे तिकीट आरक्षण तंत्रज्ञान उबर ॲपशी जोडण्यात आले आहे. प्रवाशांना उबर ॲपच्या होम स्क्रीनवरील किंवा ‘सर्व्हिस’ विभागातील ‘बस वा ट्रेन’ पर्याय निवडून रेल्वे तिकीट आरक्षित करता येईल. त्यानंतर प्रवासाचे प्रारंभिक व अंतिम स्थान, प्रवासाची तारीख टाकून उपलब्ध रेल्वेगाड्यांमधून पसंतीची गाडी निवडता येईल.
आरक्षण पूर्ण झाल्यानंतर तिकीटाची माहिती व पीएनआरची स्थितीही ॲपमध्ये पाहता येईल. रेल्वे तिकीट आरक्षित झाल्यानंतर प्रवाशांना रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी किंवा गंतव्य स्थानकावरून पुढील प्रवासासाठी उबर ‘राइड’ही आरक्षित करता येईल. त्यामुळे घरापासून रेल्वे स्थानक व स्थानकापासून अंतिम ठिकाणापर्यंतचा प्रवास एकाच ॲपवरून नियोजित करता येणार आहे, असे उबरकडून सांगण्यात आले.
देशभरातील अनेक रेल्वे स्थानकांवर उबरची ने-आण करण्याची सुविधा यापूर्वीपासून उपलब्ध आहे. आता रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा जोडल्याने उबरने आपल्या आंतरशहर व विविध मार्गांवरील प्रवास सेवांचा विस्तार केला आहे. मोटो, ऑटो, कार, मेट्रो, आंतरशहर कार व आंतरशहर बसनंतर आता उबर ॲपवर रेल्वे तिकीट आरक्षणाची सुविधाही उपलब्ध झाली आहे.
सुलभ प्रवास भारतातील लाखो प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास हा दैनंदिन व लांब पल्ल्याच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे. रेल्वेत चढण्यापूर्वी आणि गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतरचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल, असे उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे व्यवसाय विकास संचालक अर्णब कुमार यांनी सांगितले.
नियोजित प्रवास रेल्वे प्रवास अधिक सुलभ, विश्वासार्ह व तणावमुक्त करण्यासाठी ‘इक्सिगो’ सातत्याने काम करीत आहे. उबरशी भागीदारीमुळे रेल्वे प्रवासाच्या पलीकडेही प्रवाशांना घरापासून गंतव्यस्थापर्यंतचा प्रवास नियोजित करता येईल, असे ‘इक्सिगो’चे ग्रुप सीईओ अलोके बाजपाई आणि ग्रुप को-सीईओ रजनीश कुमार यांनी सांगतिले.
