Akhil Chitre React to Mohit Kamboj : राज्यात १५ जानेवारी रोजी २९ महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आज मतमोजणी होत असून त्याआधीच भाजपा आणि शिवेसना (उद्धव ठाकरे) यांच्यात एक्झिट पोल्सवरून एक्सवॉर सुरू झाले आहे. मुंबईत भाजपाला १०० पेक्षा जास्त जागा येणार असं मोहित कंबोज यांनी म्हटलंय. तर, त्यावर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) अखिल चित्रे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मोहित कंबोज यांनी काल (१५ जानेवारी) मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता भाजपा मुंबईत १०० पेक्षा जास्त जागा जिंकेल असं ट्वीट केलं. त्यांच्या या ट्वीटला अखिल चित्रे यांनी आज सकाळीच उत्तर दिलं. अखिल चित्रे म्हणतात, “क्रोनोलॉजी समजून घ्या. भाजपा निवडणुकीत पाण्यासारखा पैसा ओततो. तेव्हा कंबोज अमेरिकेत असतो…मग कंबोज निवडणुकीच्या आधी भारतात येतो… भाजपाच्या विजयाचे आकडे देतो. तसेच एक्झिट पोल येतात.आणि तरीही जनमानस चिंतेत आणि फक्त कंबोजचा पक्ष आसुरी आनंदात असतो!”

ते पुढे म्हणतात, “हेच आपण पाहतोय आणि निवडणूक निकालात हे कंबोजचे आकडे खरे ठरले तर ‘कंबोज : अमेरिका : ईव्हीएम : भाजपा : अघोरी बहुमत’ ह्यांचा परस्परांशी काहीही संबंध आढळला तर तो महाराष्ट्र्राने योगायोग का समजावा? पण आता वाचा आणि निमूटपणे सहन करा!”

मतमोजणी सकाळी दहापासून

मतमोजणीस शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरुवात होणार असून, सायंकाळी सहापर्यंत सर्व पालिकांमधील निकाल जाहीर होतील, अशी शक्यता वर्तविली जाते. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये मुंबईसह बहुतांशी महानगरपालिकांमध्ये भाजप व महायुतीला सत्ता मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पण निकाल काही तासाने लागणार असल्याने हे निष्कर्ष किती खरे ठरतात हे स्पष्ट होईल. जर यावेळीही ठाकरे बंधूंती सत्ता आली नाही तर त्यांच्यासाठी खूप मोठा राजकीय धक्का असेल.