मुंबई : मुस्लीम बहुल प्रभागांमध्ये शिवसेनेच्या (ठाकरे) पारड्यात मते पडतील असा अंदाज होता. मात्र ट्रॉम्बे चिता कॅम्प परिसरातील मुस्लीम बहुल प्रभाग क्रमांक १४५ मधून एएमआयएमच्या उमेदवार खैरनुसा अकबर हुसेन विजयी झाल्या. त्यांना ७६५३ मते मिळाली. या प्रभागात शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार अरुण हुले चांगला प्रतिसाद मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र हा अंदाज फोल ठरला.

या प्रभागातून विजयी झालेल्या खैरनुसा अकबर हुसेन आणि अपक्ष उमेदवार दीपक फालोड यांच्यात लढत झाली. फालोड यांना ५,५५८ मते मिळाली. खैरनुसा अकबर हुसेन यांचा २०९५ मताधिक्याने विजय झाला. खैरनुसा अकबर हुसेन या एएमआयएमचे नेते अकबर हुसेन यांच्या पत्नी आहेत. शिवसेना (ठाकरे) – मनसे – राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार अरुण हुले यांना २२५७ मते मिळाली असून मतांच्या वर्गवारीत ते पाचव्या स्थानावर आहेत.