गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचे विशेष सीबीआय न्यायालयाचे निरीक्षण
मुंबई : सुमारे ७४ कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळा प्रकरणात ‘टॉपवर्थ स्टील्स अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड’ (टीएसपीपीएल) आणि ‘टॉपवर्थ ग्रुप’चे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक अभय लोढा यांना दोषमुक्त करण्यास विशेष सीबीआय न्यायालयाने नुकताच नकार दिला. गुन्ह्यात लोढा यांचा सक्रिय सहभाग स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण विशेष न्यायालयाने लोढा यांची दोषमुक्तीची मागणी फेटाळताना नोंदवले.
लोढा यांनी इतर आरोपींसह बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून युको बँकेची ७४.८२ कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा कट रचला होता, असा सीबीआयचा आरोप आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. पी. देसाई यांनी गेल्या आठवड्यात लोढा यांची दोषमुक्तीची मागणी फेटाळली. न्यायालयाच्या निर्णयाचा सविस्तर आदेश मंगळवारी उपलब्ध झाला. लोढा हे या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत आणि त्यांच्या सहभागाशिवाय गुन्हा घडू शकला नसता. गुन्ह्याच्या सर्व महत्त्वाच्या टप्प्यांवर लोढा यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो, असे निरीक्षण न्यायालयाने लोढा यांना दिलासा नाकारताना नोंदवले. ही फसवणूक गुन्हेगारी हेतूने करण्यात आल्याचेही पुराव्यांतून स्पष्ट होते, असेही विशेष न्यायालयाने आदेशात नमूद केले.
युको बँकेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने २०१८ मध्ये लोढा आणि अक्षता मर्केंटाइल प्रायव्हेट लिमिटेड (एएमपीएल) फर्मच्या पदाधिकाऱ्यांसह इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. लोढा यांची टॉपवर्थ ग्रुप कंपनीच्या एएमपीएलने युको बँकेतील एलसी सवलतीतून मिळवलेले ७४.८२ कोटी रुपये समूहाच्या इतर कंपन्यांकडे वळवले. कर्जाच्या रकमेचा एक भाग म्हणजेच ४३ लाख रुपये अभय लोढा आणि अश्विन लोढा यांच्या नावावर असलेल्या गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी वापरण्यात आला, असा सीबीआयचा आरोप आहे.
लोढा यांचा दावा
आपण निर्दोष असून या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा लोढा यांनी प्रकरणातून दोषमुक्तीची मागणी करताना केला होता. आपण एएमपीएलचे संचालक नव्हतो किंवा कंपनीच्या दैनंदिन कामकाजातही सहभागी नव्हतो, असा दावाही लोढा यांनी अर्जात केला होता. यूको बँक एएमपीएलशी झालेल्या कराराच्या प्रक्रियेत सहभागी होती. अंतर्गत संवाद म्हणून बँकेकडून राबवण्यात येणाऱ्या पडताळणी प्रक्रियेचा हा भाग असल्याचा दावा देखील लोढा यांच्यावतीने करण्यात आला होता.
लोढा यांचा गुन्ह्यात सहभाग
लोढा यांचा या फसवणूकीच्या गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचा दावा करून सीबीआयने त्यांच्या दोषमुक्तीच्या अर्जाला विरोध केला. तसेच, लोढा यांच्यावर विविध बँकांकडून फसवणुकीच्या एलसी सुविधांशी संबंधित सहा समान प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल असल्याचेही सीबीआयने लोढा यांचा अर्ज फेटाळण्याची मागणी करताना विशेष न्यायालयाला सांगितले.
न्यायालयाचे म्हणणे…
लोढा हे एएमपीएलचे संचालक नसतील, परंतु तपास अधिकाऱ्याने सादर केलेल्या पुराव्यांतून एमपीएल ही टॉपवर्थ ग्रुप कंपनीचा भाग होती, असे स्पष्ट होते. त्यामुळे, लोढा यांचे एएमपीएलच्या व्यावसायिक बाबींवर थेट नियंत्रण आहे, असेही विशेष न्यायालयाने आदेशात प्रामुख्याने नमूद केले. तसेच, लोढा यांच्यावरील आरोप हे निराधार मानले जाऊ शकत नाही, असा निष्कर्षही विशेष न्यायालयाने लोढा यांची दोषमुक्तीची मागणी फेटाळताना नोंदवला.