Sanjay Raut on Mumbai Municiple Mayor : मुंबई महापालिका निवडणुकीत निर्विवाद भाजपाला मते मिळाली आहेत. त्यामुळे, शिवसेनेची ३० वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपाला यश आलं. अशातच देवाच्या मनात आलं तर शिवसेनेचा महापौर बनेल असं सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत केलं. त्यातच आज संजय राऊत यांनी पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू आहेत, असं विधान करून सामान्य मतदारांना संम्रभात टाकलं आहे. त्यामुळे मुंबईच्या महापालिकेवर कोणाचा महापौर बसेल हे पाहणं महत्त्वाचं आहे.
“ज्यांनी स्वतःचे शिवसेनेचे आमदार फोडले त्यांना आता नगरसेवक फुटतील अशी भीती वाटत असेल तर आश्चर्याची गोष्ट आहे. आमदारांना त्यांनी सुरतला ठेवलं आणि नगरसेवकांना इथे कोंडून ठेवलं आहे. त्यांच्यासाठी सुरक्षित जागा ही खरंतर सुरत आहे. त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीचीही भीती वाटते आहे. जिथे मुख्यमंत्री भाजपाचे आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत तरीही त्यांना वाटत असेल की आपले नगरसेवक फोडले जातील, पळवले जातील असं वाटत असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणातली ही हास्यजत्रा आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
कोणीही कितीही कोंडून ठेवलं तरी…
“नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक आहेत ते शिवसेनेचे आहेत. त्यांच्या मनातही मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल धगधगते आहे. भाजपाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळ जवळ सगळ्यांनी ठरवलं आहे. निवडून आलेले जे नगरसेवक आहेत, ते मूळचे शिवसैनिक आहेत. जो शिवसैनिक असतो त्याच्या मनात शिवसेनेबाबत वेगळी भावना आहे. भाजपाचा महापौर होऊ नये हे त्यांच्या मनात आहे हे आम्हाला समजलं आहे. कुणी कितीही कोंडून ठेवलं तरीही इतकी साधनं असतात संपर्काची, दळणवळणाची त्यानुसार संदेश येत असतात”, असंही ते म्हणाले.
पडद्यामागे बऱ्याच गोष्टी सुरू
“मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचा किंवा शिवसेनेचा व्हावा यापेक्षा भाजपाचा होऊ नये अशी एकनाथ शिंदेंसह असलेल्यांचीही इच्छा आहे. देवाची इच्छा असेल तर महापौर बसू शकतो. मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचीही फोनवरून चर्चा झाली. आम्ही तटस्थपणे सगळ्या हालचालींकडे पाहात आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. आम्ही महापौरपदावर दावा केला आहे असं नाही. जे काही आकडे आहेत ते जवळजवळ सारखे आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.
… त्यापेक्षा इथेच बसून दावोसच्या गोष्टी करा
“भाजपा हा जगातला मोठा पक्ष आहे पण त्यांना चारचंच बहुमत मिळालं. शिवाय बहुमत कितीही मोठं असलं तरीही बहुमत हे पाऱ्यासारखं चंचल असतं. महायुतीचा महापौर बसणार असता तर २९ नगरसेवक कोंडले नसते, यावर आमच्या देवाभाऊंचं काय म्हणणं आहे? देवेंद्र फडणवीस दावोसला गेले आहेत, पण काय गुंतवणूक वगैरे काही दिसत नाही. दावोसला बसूनही ते महापालिकेचं राजकारण करणार आहेत त्यापेक्षा इथे बसून दावोसच्या गोष्टी करा”, असा सल्लाही त्यांनी दिला.
“नगरसेवक जर लपवून ठेवावे लागत असतील तर कायदा सुव्यवस्थेचं राज्य नाही हे एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना कृतीतून दाखवू दिलं आहे असंही संजय राऊत म्हणाले. मुंबईचा महापौर शिवसेनेचा, डुप्लिकेट शिवसेनेचा नाही. पण अमित शाह यांना त्यांचा माणूस महापौरपदी बसवायचा आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना ते मान्य नाही”, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
