पालिकेत सत्ताधारी पक्षात असूनही स्वपक्षाच्याच आमदारामुळे असुरक्षित झालेल्या नगरसेविकांना अखेर महिनाभरानंतर उद्धवा दरबारी मन मोकळे करता आले. शनिवारी तासभर चाललेल्या बैठकीत नगरसेविकांच्या मनातला खदखदता असंतोष ऐकून घेतल्यावर ‘योग्य वेळी योग्य कारवाई’ करण्याचे आश्वासन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आले, तरी योग्य वेळ नेमकी केव्हा येणार आणि कारवाई नेमकी कशी केली जाणार हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
बोरीवली, दहिसर परिसरातील शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे, शुभा राऊळ आणि भाजपाच्या नगरसेविका मनिषा चौधरी यांनी आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर पालिका ढवळून निघाली होती. सार्वजनिक प्रसाधनगृहावर नगरसेविकांचा मोबाइल क्रमांक लिहिणे, फेसबुकवरून त्यांना धमकी देणे असे प्रकार होत असल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेविकांनी केल्यावर गहजब उडाला होता. या प्रश्नावरून पालिका सभागृहातही गोंधळ सुरू झाला. मात्र पक्षप्रमुखांनी तरीही नगरसेविकांना दूरच ठेवले.
अनेकदा प्रयत्न करूनही पक्षप्रमुख भेटीची वेळ पुढे ढकलत राहिले. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळ्ये यांनीही नगरसेविकांची भेट घेतली. विधिमंडळ महिला हक्क व कल्याण समितीनेही पालिकेत येऊन सर्वपक्षीय नगरसेविकांकडे चौकशी केली. विरोधकांनी या मुद्दय़ाचे कोलित हाती सापडल्यावर महापालिकेतील सभागृह तहकूब करायला भाग पाडली. चौथ्या वेळी सभागृह तहकूब होत नसल्याचे पाहून सभात्याग करून प्रतिसभागृह भरवले. एवढा हल्लकल्लोळ सुरू असतानाही नगरसेविकांचे म्हणणे ऐकून घेण्याची तसदी पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी दाखवली नाही. पक्ष सोडून जाणार नाही, असे वारंवार स्पष्ट करणाऱ्या नगरसेविकांचे अथक परिश्रम अखेर कामी आले आणि उद्धवा दरबारी त्यांना शनिवारी चंचुप्रवेश मिळाला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे सर्व म्हणणे ऐकून घेतले व कारवाईचे आश्वासन दिले. त्यामुळे गेला महिनाभर मनावर असलेला ताण निवळला आहे. आम्ही पक्षासोबतच आहोत, पक्ष देईल ती कामगिरी आनंदाने पार पाडू, असे नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी सांगितले. योग्य वेळ आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिल्याचे समजते. मात्र योग्य वेळ निवडणुकांपूर्वी येणार की नंतर ते स्पष्ट झालेले नाही. मात्र तूर्तास तरी नगरसेविकांच्या विषयावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2014 रोजी प्रकाशित
अखेर उद्धव – नगरसेविका भेट
पालिकेत सत्ताधारी पक्षात असूनही स्वपक्षाच्याच आमदारामुळे असुरक्षित झालेल्या नगरसेविकांना अखेर महिनाभरानंतर उद्धवा दरबारी मन मोकळे करता आले.
First published on: 02-02-2014 at 04:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav takraye meets sheetal mhatre