मुंबई : सध्या पैशांचा धुमाकूळ सुरू आहे. निवडणूकीच्या निमित्ताने दोन दिवस पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरु राहणार आहे. त्यामुळे पैसे वाटताना कोणी दिसल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. पण त्या पैशांसाठी स्वतःचे आयुष्य विकू नका. कर्तव्याला चुकू नका, मुंबई आपली आहे, ती आपल्याचा ताब्यात ठेवा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.
महापालिका निवडणूकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी शाखांना भेटी दिल्या. यावेळी मुंबई विमानतळ येथील शाखा भेटीदरम्यान त्यांनी शिवसैनिक व मतदारांशी संवाद साधला. गद्दारी वृत्तीवाले निर्लज्जपणे पैसे वाटत आहेत. ठाण्यात आपल्या आणि मनसेच्या काही उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी कोटींची ऑफर देण्यात आली होती, असा आरोप करत आम्ही केलेल्या कामांच्या जोरावर मते मागत आहोत, तुम्हीही कामे केली असतील तर ती दाखवा आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरा.
पण दाखवण्यासारखे त्यांनी काही केलेले नाही, मात्र, त्यांच्याकडे वाटण्यासाठी भरपूर आहे, असा टोला ठाकरे यांनी लगावला. आता पैसे वाटतानाही त्यांना पराभवाची भीती वाटत आहे. आज आणि उद्याची रात्र त्यांचे पैसेवाटप सुरू राहणार आहे. मात्र, त्या पैशांसाठी स्वतःचे आयुष्य विकू नका. कर्तव्याला चुकू नका, मुंबई आपली आहे, ती आपल्याचा ताब्यात ठेवा. आता झुकाल तर मुंबईला मुकाल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
भ्रष्टाचाराविरोधात लढतोय
आपण निवडणूक नाही, तर गद्दार आणि भ्रष्टाचाराच्या वृत्तीविरोधात लढत आहोत. छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आपल्या दैवतांचे पुतळे आज झाकले जात आहेत, आपली मराठी अस्मिता मारण्याचा प्रयत्न होत आहे. आपल्या भाषेवर आक्रमण होत आहे. ही गद्दारी आणि महाष्ट्रद्रोही वृत्ती आहे. या वृत्तीचा पराभव करण्यासाठी मशालीला मत द्यावे लागेल. निवडून दिलेले गद्दार निघतात, मात्र, निवडून देणारे कधीही गद्दार नाहीत, हे दाखवणारी ही निवडणूक आहे. तुमच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आत्मविश्वासामुळे विजय आपलाच होणार, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
