मुंबई : भाजप दोन खासदारांचा पक्ष होता, यांना गल्लीतले कुत्रेसुद्धा विचारत नव्हते. तेव्हा शिवसेनेने यांचे बोट धरुन मोठे केले. दुसऱ्यांची पोरे चोरुन मोठी झालेली भाजप आज शिवसेना संपवायला निघाली आहे. भाजपच्या या पापी कृत्याचा येणाऱ्या निवडणुकीत वचपा काढा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.

शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यामध्ये भांडूपचे खासदार संजय दिना पाटील आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भांडूप येथील शिवसेना शाखेला रविवारी सायंकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी संजय दिना पाटील यांचा ‘उपरा’ असा उल्लेख केला. उपऱ्याला तुमच्यामुळे आज भाव आला, नाहीतर याला विचारतो कोण, असे म्हणत उद्धव यांनी दिना पाटील यांच्या गद्दारीविषयी मतदारांची माफी मागितली.

शिवसेनेची उभी हयात काँग्रेसबरोबर वैरात गेली. मात्र काँग्रेसने कधी शिवसेना चोरली नाही की फोडली नाही. अगदी आणिबाणी काळात सुद्धा शिवसेनेवर बंदी लादली नाही. पण, मिंद्याला पुढे करत शिवसेना पुन्हा फोडली जात असून हे भाजपचे पाप आहे. आज उपऱ्यांचे आजोबा दिल्लीतून शिवसेना प्रमुख ठरवायची स्वप्ने पाहात आहेत. कारण, त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्ने पडत आहेत. पण, दुसरे शिवसेनाप्रमुख होणे नाही, असे उद्धव यांनी बजावले.

जेथे गद्दारी झाली, तेथे मी जाणार आहे आणि मतदारांची माफी मागणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. शिवसेना फुटली म्हणून मी खचलो नाही. अशी अनेक संकटे झेलली आहेत. उलट त्यांच्या या दृष्कृत्यामुळे मशाली अधिक धगधगू लागल्या आहेत. पक्षाचा स्वतंत्र गट केवळ काही संसद सदस्य ठरवू शकत नाहीत. पक्षाने त्याला मान्यता द्यावी लागते. त्यामुळे सहा गद्दार लटकणार आहेत. त्यांना लोंबळकत राहू द्या, असे उद्धव म्हणाले. भाजपच्या नीच राजकारणाविरोधातला उद्रेक वाढत चालला आहे. त्यामुळे भाजपच्या दाढीपेक्षा काॅक्रोचच्या मिशा आज लांब झाल्या आहेत.

भडकलेला युवक कधी यांचे सिंहासन खाली खेचेल त्यांना कळणार नाही. शिवसेना केवळ पक्ष नसून भूमीपुत्रांची संघटना आहे. गद्दारांचे अन उपऱ्यांचे आजोब-पणजोबा आले तरी ते शिवसेना प्रमुख ठरवू शकणार नाहीत. तुम्ही तुमचे घर सांभाळा. कुणीही टीनपाटा आणावा आणि अध्यक्ष करावा, इतके शिवसेनेत सोपे नाही, असा इशारा उद्धव यांनी भांडुप येथे झालेल्या सभेमध्ये दिला.