Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी सांगितल्या. तसेच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत मुंबईत आपला निसटता पराभव झाल्याचं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“एखाद्या निवडणुकीत आपल्या मनासारखं नसेल झालं. मुंबईत आपला थोडक्यात आणि निसटता पराभव झाला. मात्र, तरीही आपली एक चांगली ताकद महापालिकेत गेली आहे. इतर ठिकाणी देखील निवडणुका होत आहेत. निवडणुका जिंकण्याचं तंत्र त्यांनी विचित्र पद्धतीने अवलंबलेलं आहे. यावेळी मुंबईच्या निवडणुकीत ईव्हीएमच्या बरोबरच ते व्हीव्हीपॅट मशीनच काढून टाकलं. म्हणजे आपण नेमकं मतदान कोणाला करत आहोत हेच आपल्याला कळत नाही. मग याला लोकशाही म्हणायचं का? ज्या पद्धतीने मतदान केंद्रावर घोळ झाले, आपण वेळत दुबार मतदार शोधून काढले नसते तर मुंबईचा निकाल आणखी वाईट लागला असता. अन्यथा हे असं समजत होते की आता शिवसेना संपली आणि आपल्याला चरायला कुरण मोकळं झालं. आरे येतो कसा बघतो ना, कुरण चरायला ये नाय तुझ्या पेकाटामध्ये दांडकं टाकलं तर बघ”, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

‘जेव्हा माणसं विकली जातात तेव्हा वाईट वाटतं’

“जेव्हा माणसं विकली जातात तेव्हा वाईट वाटतं. कारण यांना कळतं का की तुम्ही कोणासाठी काय करत आहात? जेव्हा ही लढाई आपण लढत असतो तेव्हा काही माणसं विकली जातात तेव्हा वाईट वाटतं आणि असं वाटतं की या लढाईला काही अर्थ आहे की नाही? पण १०० पराभव झाले तरी एक मोठा विजय सुख देऊन जातो”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘शिवसेना हा पक्ष नाही तर विचार’

“भाजपाला असं वाटत असेल की शिवसेना ते संपवतील. मात्र, शिवसेना ते कधीही संपवू शकणार नाहीत, कारण शिवसेना हा फक्त पक्ष नाही तर विचार आहे. शिवसेना ही अन्याग्रस्तांच्या काळजात पेटलेली मशाल आहे. शिवसेनेचा जन्म हा घरे पेटवण्यासाठी झालेला नाही तर घरातील चूल पेटवण्यासाठी झालेला आहे. एक गद्दार गेला असेल, पण एका गद्दाराची जागा चार निष्ठावतांनी घेतली हे आपल्याला येणाऱ्या काळात दाखवून द्यायचं आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

‘मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापाऱ्यांचा…’

“बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांना जगायचं कसं हे शिकवलं. कारण जर जगायचं कसं हेच आपण विसरून गेलो तर जसं पूर्वी गुलामगिरीत आपण राहत होतो तसं या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम म्हणून आयुष्य जगावं लागेल. मात्र, गुलामीचं जीवन आपल्याला कदापी शक्य नाही. मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम म्हणून आयुष्यात कधी जगणार नाही अशी शपथ सर्वांनी घेतली पाहिजे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली.