मोदींसारखा पाठिंबा शिवसेनाप्रमुखांना मिळाला असता चित्र वेगळे असते : उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये जसा पाठिंबा दिला गेला, तसा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मराठी जनतेकडून मिळाला असता, तर आज चित्र वेगळे दिसले असते,’ असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी येथे केले. ‘अध्र्यामुध्र्या सत्तेने कामे करता येत नाहीत, असे मत व्यक्त करीत ठाकरे यांनी राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना ही ‘लाट’ नाही, तर हिंदूत्वाचा आणि मराठी माणसाचा श्वास आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ‘सुवर्णमहोत्सवी शिवसेना-५० वर्षांची घोडदौड’ या हर्षल प्रधान व विजय सामंत लिखीत पुस्तकाचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मंगळवारी झाले. यावेळी ठाकरे यांनी शिवसेनेची वाटचाल व भूमिकेविषयी विवेचन केले. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींना मिळालेल्या पाठिंब्याचा संदर्भ देऊन ठाकरे म्हणाले,  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिशी मराठीजन राहिले असते, तर आज राज्यात वेगळे चित्र दिसले असते. पण शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत आप्तस्वकीयांनीच वार केले. स्वकीयांशी काही लढाया टळल्या असत्या, तर शिवसेनाप्रमुखांनी चमत्कार करुन दाखविला असता. पण स्वतच्या स्वार्थासाठी काहीजण त्यांना सोडून दिले, तर काहींना शिवसेनाप्रमुखांनी हाकलले. मुंबई, महाराष्ट्रातून शिवसेनेला संपविण्याची काहींची इच्छा आहे, याचा संदर्भ देत ठाकरे यांनी,‘ शिवसेनेला चुकून संपविलेच, तर येणाऱ्या हिरव्या संकटाचा सामना करण्याची हिंमत त्यांच्या मनगटात आहे का, ’ असा सवाल भाजपचा उल्लेख न करता केला.

  • सत्तेवर सहभागी असताना मंत्री असलात तरी तुमच्यातला शिवसैनिक मरु देऊ नका, नाहीतर तुम्हाला किंमत मिळणार नाही, असा सज्जड दम ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला.
  • सत्तेत असूनही जनतेची कामे होत नाही, अशा तक्रारी शिवसेनेच्या काही मंत्र्यांविरुध्दही आमदारांनी ठाकरे यांच्याकडे सोमवारीच तक्रारी केल्या होत्या.