शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात शिंदे गटावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गल्लीत गोंधळ असताना दिल्लीत मुजरा करायला जातात, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. या सरकारने आधी खोक्यातून बाहेर यावं, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला.

हेही वाचा – “आदिलशाह, निजामशाहाच्या कुळातले आताचे शाह म्हणजे अमित शाह” गिधांडांशी तुलना करत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“हे सरकार अस्थित्वात आल्यानंतर या सरकारने आपण घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. राज्यातून एक-एक उद्योग निघून जात आहे. मात्र, मिंधे गट ‘होय महाराजा’ करत चूपचाप बसला आहे. आज सुद्धा मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत. गल्लीत गोंधळ असताना ते दिल्लीत मुजरा करत आहेत. दिल्लीसमोर किती वेळा झुकले असतील. याची कल्पना नाही. मात्र, महाराष्ट्राची बाजू घेऊन दिल्लीला ठणकावून का नाही सांगत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

हेही वाचा – “…तर प्रत्येक घरात मृतदेह आढळला असता” किशोरी पेडणेकरांनी शिंदे गटावर साधला निशाणा

“येत्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयातून येणारा निर्णय हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नाही, तर देशात लोकशाही जिंवत आहे की नाही हे ठरवणारा आहे. आज हे लोकं भ्रष्टाचाराबाबत बोलत आहेत. मात्र, भ्रष्टाराबाबत बोलायची यांची लायकी नाही. ‘खोके सरकार’ अशी यांची ख्याती झाली आहे. आधी त्यांनी खोक्यातून बाहेर यावं आणि मग भ्रष्टाचारावर बोलावं, इतकी वर्ष ज्यांना आपण मान सन्मान दिला. सत्तेचं दुध पाजलं, त्यांनी आज तोंडाची गटारं उघडली आहेत.”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.