Uddhav Thackeray Dasara Melava 2022 Marathi | Balasaheb Thackeray Shivaji Park, Thackeray vs Shinde Dasara Melava 2022 News | Loksatta

Dasara Melava 2022 : “रावणाने संन्याशाचं रुप घेऊन सीतेचं हरण केलं होतं, तसं हे तोतये…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल!

Uddhav Thackeray Dasara Melava 2022 : शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मोठी गर्दी!

Dasara Melava 2022 : “रावणाने संन्याशाचं रुप घेऊन सीतेचं हरण केलं होतं, तसं हे तोतये…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल!
उद्धव ठाकरे गट दसरा मेळावा २०२२ लाइव्ह

Uddhav Thackeray Dasara Melava 2022 Live at Shivaji Park, Shinde vs Thackeray : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात दसरा मेळाव्यावरून तुफान राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. अखेर मुंबईच्या शिवाजी पार्कवर सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. तर दुसरीकडे बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला.

या पार्श्वभूमीवर या सभेतील नेतेमंडळींच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं होतं.

अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान आरोप-प्रत्यारोप आणि टोलेबाजी या भाषणांमध्ये पाहायला मिळाली.

Live Updates

Uddhav Thackeray Dasara Melava 2022 Live News : उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, कुणाला लक्ष्य करणार?

21:38 (IST) 5 Oct 2022
“अमित शाह केंद्रीय मंत्री आहेत की भाजपाचे घरगुती…!”

उद्धव ठाकरे म्हणतात, “अमित शाह केंद्रीय मंत्री आहेत की भाजपाचे घरगुती…!”

वाचा सविस्तर

21:11 (IST) 5 Oct 2022
उद्धव ठाकरे म्हणतात, ““पुष्पा चित्रपट आला होता ना. त्यात ‘झुकेगा…!”

उद्धव ठाकरे म्हणतात, ““पुष्पा चित्रपट आला होता ना. त्यात ‘झुकेगा…!”

वाचा सविस्तर

20:39 (IST) 5 Oct 2022

एका अर्थी झालं ते बरं झालं. बांडगुळं सगळी छाटली गेली. ही बांडगुळं आपण आपल्या फांद्यांवर पोसत होतो. पण त्यांच्या लक्षात आलं नाही की बांडगुळांची मुळं फांद्यांमध्ये असतात, पण फांद्यांची मुळं जमीनीत असतात. बांडगुळाला स्वत:ची ओळख नसते. तो सांगू शकत नाही की तो बांडगूळ आहे. अंगावर आता आलेलाच आहात, आता आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांना शिंगावर घ्यावं लागेल. प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाणी पाजावं लागेल – उद्धव ठाकरे

20:37 (IST) 5 Oct 2022

यांच्या घोषणांची अतीवृष्टी आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं हे सरकार आहे. म्हणून मला चिंता नाहीये. मी लढणाऱ्या पित्याचा लढणारा मुलगा आहे. पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेवर आलेली संकटं बघत मोठा झालो आहे. आजही माझ्या हातात काहीच नाहीये. माझ्यासोबत चालायचं असेल, तर निखाऱ्यावर चालण्याची तयारी हवी. जसं मी माझ्या पित्याला वचन दिलं होतं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, तसंच मी तुम्हाला वचन देतोय.. तुमच्या मनातल्या या आगीतून उद्या हिंदुत्वाचा वणवा पेटणार आहे. त्यात सगळ्या गद्दारांची गद्दारी भस्मसात होणार आहे. तुम्ही साथ द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन – उद्धव ठाकरे

20:36 (IST) 5 Oct 2022

दुर्दैवाने त्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आपल्याकडून मी, सुभाष देसाई, आदित्य आणि अनिल परब हेच होते. ज्यावेळी नामकरणाचा ठराव आला, त्याच्या दुसऱ्याच क्षणाला काँग्रेस-राष्ट्रवादीनं हो म्हटलं आहे. मग काय आम्ही हिंदुत्व सोडलं? उलट त्यांना घेऊन आम्ही हिंदुत्व वाढवत होतो – उद्धव ठाकरे

20:35 (IST) 5 Oct 2022

आम्ही काँग्रेससोबत गेलो, म्हणून हिंदुत्व सोडलं म्हणता. मग पाच वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो. त्यात कसं जाऊन अशोक चव्हाणांना जाऊन भेटले होते, हा त्यांनी गौप्यस्फोट केला आहेच. पण आम्ही सोबत असतानाही औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव केलं नाही. पण ते काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत असताना मी करून दाखवलं आहे – उद्धव ठाकरे

20:34 (IST) 5 Oct 2022

माझं आव्हान आहे. एकच व्यासपीठ. तुम्ही भाजपाची स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवायचं. मी मुख्यमंत्री असताना ४-५ पत्रकार परिषदा झाल्या. माझ्या बाजूला अजित पवार बसायचे. कधीच त्यांनी माझ्यासमोरचा माईक खेचला नव्हता. माझ्या कानात माझं उत्तर सांगितलं नव्हतं. काँग्रेस-राष्ट्रवादीनं मान-सन्मान देऊन आपली सोबत केली आहे. सरकार झालं, तेव्हा अनेकांनी सांगितलं की ते काँग्रेस बघा..काहीतरी गडबड आहे. शरद पवार तुम्हाला माहिती आहे.. नीट लक्ष ठेवा हां… अडीच वर्ष त्यांच्याकडे लक्ष ठेवता ठेवता हेच निघाले.. मग गद्दार कोण?

20:32 (IST) 5 Oct 2022

रावणाने संन्याशाचं रुप घेऊन सीतेचं हरण केलं होतं, तसं हे तोतये बाळासाहेबांचा चेहरा लावून शिवसेना हडपायला आले आहेत. शिवाजी पार्क मिळू नये म्हणून हे मागे लागले. कोर्टात निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात जर मी लक्ष घातलं असतं, तर यांना हे मैदान मिळालं नसतं. काय बापाची पेंड आहे तुमच्या? गद्दार तर आहेतच. आता धनुष्यबाण हवं, बाळासाहेब हवेत, शिवाजी पार्क हवं.. घेऊन जाणार कुठे? – उद्धव ठाकरे

20:31 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – तोतयांचे बंड नाटकाच्या प्रस्तावनेतील एक उतारा उद्धव ठाकरेंनी वाचून दाखवला!

हे आत्ता जे तोतये तिकडे चाललेत, त्यांच्यासाठी सांगतो, न चि केळकरांनी तोतयांचे बंड हे नाटक लिहिलं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी यावेळी या नाटकाच्या प्रस्तावनेतील एक उतारा वाचून दाखवला.

20:29 (IST) 5 Oct 2022

नुसतं याला काय कळतं, त्याला काय कळतं.. नाही कळत. माझा तर विचार होता की या सभेला येण्याऐवजी तिथे जाऊन नवीन हिंदुत्वाचे विचार ऐकावेत. ईडीच्या कार्यालयात गेलं की लगेच यांच्या हिंदुत्वाच्या घागरी फुंकायला लागतात – उद्धव ठाकरे

20:28 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – ..तर इतर लोक महिलाशक्तीचा काय आदर राखणार? – उद्धव ठाकरे

बिल्किस बानो गुजरात दंगलीमध्ये गर्भवती होती. तिच्यावर बलात्कार झाला. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या चिमुकलीचा खून करण्यात आला. आरोपी शिक्षा भोगत होते. गुजरात सरकारने त्यांना सोडून दिलं. एवढंच नाही, गावी गेल्यावर त्यांचा स्वागत सत्कार केला. या गोष्टी तुमच्या पक्षात घडत असतील, तर इतर लोक महिलाशक्तीचा काय आदर राखणार? – उद्धव ठाकरे

20:26 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – उद्धव ठाकरेंनी केला अंकिता भंडारी प्रकरणाचा उल्लेख

आज मोहन भागवत म्हणाले स्त्रीशक्ती आणि पुरुष यांच्यात समानता असायला हवी. पण त्यांना मला विचारायचंय, महिला शक्तीचा आदर ठेवताना उत्तराखंडमध्ये पवनी नावाच्या जिल्ह्यात अंकिता भंडारी नावाच्या १९ वर्षांच्या मुलीचा खून झाला. तिथे एका रिसॉर्टच्या बाजूला तिचा मृतदेह आढळला. ते रिसॉर्ट भाजपाच्या स्थानिक नेत्याचं आहे. हा महिलाशक्तीचा आदर.. तो हॉटेलमालक त्या अंकिताला येणाऱ्या-जाणाऱ्यांसोबत काही करण्यास सांगत होता. तिने नकार दिला. झाला तिचा खून. कुठे आहे महिला शक्तीचा आदर? – उद्धव ठाकरे

20:25 (IST) 5 Oct 2022

मोहन भागवत मध्ये मशिदीत जाऊन आले. काय हिंदुत्व सोडलं? का मिंधे गटानं नमाज पढायला सुरुवात केली? मोहन भागवत संवाद करायला गेले होते. तेव्हा मुसलमानांनीच सांगितलं की मोहन भागवत हे राष्ट्रपिता आहेत. आम्ही सांगितलं मोहन भागवतांना राष्ट्रपती करा, तुम्ही ऐकलं नाही. आता मुसलमानांनी सांगितलं की ते राष्ट्रपिता आहेत. ते मुसलमानांसोबत बोलायला गेले तर त्यांचं राष्ट्रकार्य सुरू आहे, पण आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं. कुठले धागेदोरे कशाशी जोडतात – उद्धव ठाकरे

20:23 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची गरज आहे – उद्धव ठाकरे

देशातली लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. नड्डा म्हणाले की शिवसेना संपत चालली आहे. देशात दुसरे कोणते पक्ष शिल्लक राहणार नाहीत. तुम्हाला सावधानतेचा इशारा देतोय. याचा अर्थ देश हुकुमशाहीकडे चालला आहे. देशात पुन्हा गुलामगिरी येऊ शकते. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, जे जे देशप्रेमी असतील, त्यांनी एकत्र येऊन देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची गरज आहे – उद्धव ठाकरे

20:22 (IST) 5 Oct 2022

आपल्या लष्करात औरंगजेब नावाचा गनमॅन होता. सुट्टीवरून घरी जात असताना त्याचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांनी त्याचं प्रेत आपल्या सैन्याला मिळालं. त्याला दहशतवाद्यांनी पळवलं होतं. तो धर्माने मुसलमान होता. त्याला पळवणारे दहशतवादीही मुसलमान होते. पण तरी त्याला दहशतवाद्यांनी सोडलं नाही कारण तो भारताच्या बाजूने लढत होता. तो औरंगजेब मुसलमान असला तरी आमचा भाऊ आहे हे हिंदुत्व उघड आहे, जाऊन सांगा कुणाला सांगायचंय – उद्धव ठाकरे

20:21 (IST) 5 Oct 2022

तुमचं हिंदुत्व आहे तरी काय? इतर सर्व धर्मीय देशद्रोही असं तुमचं हिंदुत्व आहे का? की तो कुणीही असला तरी माझा आहे हे तुमचं हिंदुत्व आहे? – उद्धव ठाकरे

20:20 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – तर तुमच्याही हातात स्टेनगनच असायला हवी – उद्धव ठाकरे

पण जर कुणी त्याच्या धर्माची मस्ती आमच्यासमोर करायला लागला, तर आम्ही कडवट देशाभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभं राहू. नुसती जपमाळ ओढून हिंदू होत नाही. तुमच्या हातात जपमाळ असताना समोर दहशतवादी उभा राहिला, तर राम राम म्हणून तो पळणार नाही. तुमच्याही हातात स्टेनगनच असायला हवी – उद्धव ठाकरे

20:19 (IST) 5 Oct 2022

चला एकदा सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी एका व्यासपीठावर यावं. त्यांनी त्यांचं हिंदुत्व सांगावं, मी माझं वडिलोपार्जित हिंदुत्व सांगतो. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं की आमचं हिंदुत्व शेंडीधारी नसून राष्ट्रीयत्वाशी जोडलं गेलेलं आहे. मग व्याख्या स्पष्ट आहे. विचार सोडले, विचार सोडले म्हणत आहेत. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा सांगितलं आहे की जो या देशावर प्रेम करतो तो मुसलमान असला तरी आमचा आहे. प्रत्येकानं आपापला धर्म आपल्या घरात ठेवावा. घराबाहेर पाय ठेवला तर हा देश हाच आमचा धर्म – उद्धव ठाकरे

20:18 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ – उद्धव ठाकरे

पुष्पा आला होता ना.. झुकेगा नहीं साला.. आणि हे म्हणतात उठेगा नहीं साला. एक बार झुकेगा तो उठेगाच नही.. आता यांच्या सरकारला १०० दिवस होतायत. त्यातले ९० दिवस दिल्लीलाच गेले असतील. तिथे मुजरा करायला. दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ – उद्धव ठाकरे

20:17 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – पाकव्याप्त काश्मीर घेऊन दाखवा, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू – उद्धव ठाकरे

पाकव्याप्त काश्मीरमधला एक इंचही तुकडा परत घेऊ शकला नाहीत. चीन लेह, लडाखमध्ये घुसतंय. ती जमीन घेऊन दाखवा. आम्ही तुम्हाल डोक्यावर घेऊन नाचू, हे कशाला हवेत गद्दार. गद्दारांच्या पालखीत बसून कशाला मिरवताय? पण तिकडे शेपट्या घालायचे आणि इकडे येऊन पंजे काढायचे ही काय मर्दुमकी आहे? – उद्धव ठाकरे

20:15 (IST) 5 Oct 2022

सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या, की जेव्हा चलन घसरतं, तेव्हा त्या देशाची पत घसरत असते. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपाचे घरगुती मंत्री आहेत हेच कळत नाहीये. नुसतं या राज्यात जा, त्या राज्यात जा, इकडे काड्या घाल, हे सरकार पाड, ते सरकार पाड. मुंबईत येऊन म्हणे शिवसेनेला जमीन दाखवा. बघा आम्ही जमिनीवरच बसलो आहोत. आम्ही जमिनीवरचीच माणसं आहोत. मी आज त्यांना आव्हान देतोय की आम्हाला जमीन बघायचीच आहे. आम्हाला जमीन दाखवा. पण ती पाकव्याप्त काश्मीरची जमीन जिंकून दाखवा. हिंमत असेल तर ती एक फूट जमीन जिंकून दाखवा. ती आमची मातृभूमीच आहे. ८ वर्ष झाली. मोदींच्या मुलाखती आजही ऐकतो आम्ही. पाकिस्तानको उनकी भाषा में उत्तर देना चाहिये.. कोणती भाषा?

20:13 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – “कोंबडीचोरांवर, बापचोरांवर या मेळाव्यात जास्त नाही बोलायचं”

कोंबडीचोरावर, बाप चोरांवर या मेळाव्यावर जास्त बोलायचं नाही. या व्यासपीठाला एक अर्थ आहे, पावित्र्य आहे. ही सगळी लोकं आपल्यासाठी आले आहेत. शिव्या देणं खूप सोपं असतं, पण विचार देणं फार कठीण असतं. मी ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो – उद्धव ठाकरे

20:12 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – होसबाळेंनी भाजपाला आरसा दाखवला – उद्धव ठाकरे

आरएसएसच्या होसबाळेंनी भाजपाला आरसा दाखवला आहे. त्यात काहीतरी सुधारणा होईल अशी आशा आहे. नाहीतर स्वत:च भांग पाडत बसतील – उद्धव ठाकरे

20:11 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – महागाईच्या वेदना तुम्हाला जाणवू नयेत, म्हणून हिंदुत्वाचा डोस – उद्धव ठाकरे

तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला ना. महागाईच्या वेदना तुम्हाला जाणवू नयेत, म्हणून हिंदुत्वाचा डोस द्यायचा. तुम्ही महागाईवर बोललात, तर जय श्रीराम म्हणतील. ह्रदयात राम आणि हाताला काम पाहिजे. पण हे महागाईवर बोलत नाहीत – उद्धव ठाकरे

20:10 (IST) 5 Oct 2022

कुणाच्यातरी थडग्यावर जाऊन बोलायचं की हे थडगं बघा कसं सजवलं. पाकिस्तानात जाऊन जिनांच्या थडग्यावर डोकं टेकवणारी तुमची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं? नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? काश्मीरमध्ये सत्तेच्या लोभापायी दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या मुफ्तीच्या पक्षाशी तुम्ही साटंलोटं करता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता?

20:08 (IST) 5 Oct 2022

तिकडे ग्लिसरीनच्या खूप बाटल्या गेल्या आहेत. हिंदुत्व कसं पुढे न्यायचं, हे तुम्ही मला शिकवण्याची गरज नाही. भाजपाकडून मी हिंदुत्व शिकवण्याची शक्यताच नाही. आम्ही भाजपाची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही. आम्ही मरू तेव्हाही हिंदूच असणार. पण भाजपानं आमच्या हिंदुत्वावर शिंतोडे उडवायचे का? – उद्धव ठाकरे

20:07 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – जोपर्यंत शांत आहेत, तोपर्यंत त्यांना शांत राहू द्या – उद्धव ठाकरे

मी सांगतो शांत राहा, म्हणून हे सगळे शांत आहेत. जोपर्यंत शांत आहेत, तोपर्यंत त्यांना शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका. जर शिवसैनिकावर अन्याय कराल, तर तो आम्ही सहन करणार नाही. तुमचा कायदा तुमच्या मांडीवर कुरवाळत बसा – उद्धव ठाकरे

20:07 (IST) 5 Oct 2022

पोलिसांकडून त्या गटात जाण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. हा तुमचा कायदा? एवढंच नाही, तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही धमकी दिली जातेय की त्या गटात जा नाहीतर तुमच्या केसेस काढतो. काय सलून काढलंय तुम्ही केसेस काढण्याचं?

20:06 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – हा तुमचा कायदा असेल तर तो आम्ही जाळून टाकू – उद्धव ठाकरे

काय कायद्याच्या चौकटीत बोलायचं? मिंधे गटाचे आमदार तिथे गेले. कुणी गोळीबार करतो, कुणी चुन चुन के मारेंगेची भाषा करतो. हा तुमचा कायदा असेल तर तो आम्ही जाळून टाकू. आमच्यापैकी कुणी बोललं, तर त्याला उचलून आत टाकता. तुम्ही कुठल्या पद्धतीने कायदा चालवताय?

20:05 (IST) 5 Oct 2022

देवेंद्र फडणवीसांना कायदा चांगला कळतो. हा टोमणा नाही. त्यांना कायद्यातलं चांगलं कळतं. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जाताना बोलून गेले होते की मी पुन्हा येईन. दीड दिवस आले. दिड दिवसात विसर्जन झालं. मनावर दगड ठेवून उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले. मी खरं बोलतोय. मी कुठे टोमणा मारतोय. आता ते म्हणतायत कायद्याच्या चौकटीत बोला, नाहीतर कायदा आपलं काम करेल. देवेंद्रजी, तुम्ही गृहमंत्री आहात. पण आम्हाला सगळ्यांना कायदा कळतो. कायदा सगळ्यांनी पाळायला हवा. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरं पाळायची, हे नाही चालणार.

20:03 (IST) 5 Oct 2022

आनंद दिघेंना जाऊन २० वर्ष होऊन गेली. आजपर्यंत आनंद दिघे आठवले नाहीत. पण आज आठवतायत, कारण आनंद दिघे आता काही बोलू शकणार नाहीत. आनंद दिघे जातानाही भगव्यात गेले. ते एकनिष्ठ होते. त्यांनी भगवा सोडला नाही.

20:03 (IST) 5 Oct 2022

माणसाची हाव किती असते? इतरांना बाजूला सारून तुला आमदार केलं मंत्री केलं, आता मुख्यमंत्री झाला. पण तरी शिवसेनाप्रमुख व्हायचंय यांना. शिवसेनाप्रमुख म्हणून त्याला स्वीकारणार का तुम्ही? आहे का लायकी त्याची? एकतर स्वत:च्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी औलाद. स्वत:च्या वडिलांचा तरी विचार करायचा. त्यांना वाटेल काय हे दिवटं कार्ट माझ्या पोटी जन्माला आलं जे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या बापाचं नाव लावतंय.

20:02 (IST) 5 Oct 2022

आज तुम्ही जे केलं, हेच मी तुम्हाला म्हणत होतो. तेव्हा सांगितलं की संभवही नही. मग आत्ता तुम्ही जे केलं, ते तेव्हाच का नाही केलंत? पण शिवसेना संपवायची म्हणून हे सगळं.

20:00 (IST) 5 Oct 2022

मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा सात जणांमध्ये मी त्याचाही मान राखला होता. तेव्हा माहीत नव्हतं की बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी आहे? की बोलताना स्वत:ची दाढी स्वत:च्याच तोंडात जात होती? घेतली होती ना इथेच शपथ? अमित शाह जे बोलले की आमचं असं काही ठरलंच नव्हतं. मी आज शिवरायांच्या साक्षीनं माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो की जे मी बोलले, ते तसंच ठरलं होतं. भाजपा आणि शिवसेनेचं अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं ठरलं होतं – उद्धव ठाकरे

19:59 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 -…म्हणून मी महाविकास आघाडी केली होती – उद्धव ठाकरे

काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री, कार्ट खासदार.. कुणाचा आमदार.. पुन्हा डोळे लावून बसलेत की नातू नगरसेवक होणार. अरे त्याला मोठा तर होऊ दे. पण यांचं सगळं ध्येय काही एकच.. सगळं माझ्याकडेच हवंय. मी मुख्यमंत्री का झालो होतो? भाजपानं पाठीत वार केला म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती. – उद्धव ठाकरे

19:58 (IST) 5 Oct 2022

ज्यांना आपण सगळंकाही दिलं, मंत्रीपदं दिली, आमदारक्या, खासदारक्या दिल्या.. ते नाराज होऊन गेले. पण ज्यांना मी काही देऊ शकलो नाही, ते तुम्ही सर्व आजही माझ्यासोबत निष्ठेने आहात हे माझं नशीब आहे. ही शिवसेना एकट्या-दुकट्याची नाही. ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. तुम्ही ठरवणार आहात की मी पक्षप्रमुख राहायचं की नाही. एकाही एकनिष्ठानं सांगावं की निघून जा, मी आत्ता निघून जाईन. पण तुमच्यापैकी एकानं सांगायला हवं. गद्दारांनी सांगायचं.

19:56 (IST) 5 Oct 2022

यानंतर रावणदहन होणार आहे. पण यावेळचा रावण वेगळा आहे. आत्तापर्यंत रावण १० तोंडांचा होता. आता ५० खोक्यांचा रावण झाला आहे. हा खोकासूर आहे. काळ बदलतो, तसा रावणही बदलतो. वाईट आणि संतापही एका गोष्टीचा वाटतो, की जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो, माझी बोटंही हलत नव्हती, शरीर निश्चल पडलं होतं, तेव्हा ज्यांच्यावर मी जबाबदारी दिली होती, ते कटाप्पा.. म्हणजे कट करणारे अप्पा ते कटाप्पा.. ते कट करत होते की हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. पण त्यांना कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. तुम्ही आई जगदंबेच्या शक्तीशी पंगा घेतला आहे. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही, तेजाचा शाप आहे तो.

19:54 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही – उद्धव ठाकरे

त्यांना गद्दारच म्हणणार. मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिकटलेली असली, तरी ती काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही. तेव्हा अनेकांना प्रश्न पडला की आता शिवसेनेचं काय होणार? माझ्या मनात चिंता नव्हती. आज हे शिवतीर्थ बघितल्यावर त्यांच्या मनात पुन्हा प्रश्न पडला की अरे बापरे, गद्दारांचं कसं होणार? इथे एकही माणूस भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही. – उद्धव ठाकरे

19:52 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – ही गर्दी विकत मिळत नाही. हे ओरबाडून घेता येत नाही – उद्धव ठाकरे

ही गर्दी विकत मिळत नाही. हे ओरबाडून घेता येत नाही. ही कोरडी गर्दी नाही. अंत:करण ओलं असलेल्या माझ्या जिवाभावाच्या शिवसैनिकांची गर्दी आहे. याच मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मी तुम्हाला नतमस्तक झालो होतो. कोणत्याही अनुभवाशिवाय तुमच्या प्रेमाच्या जोरावर कारभार केला. अजूनही डॉक्टरांनी मला वाकण्याची परवानगी दिलेली नाही. पण तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही – उद्धव ठाकरे

19:51 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – हे सगळं पाहून मी भारावून गेलो आहे – उद्धव ठाकरे

गेल्या अनेक वर्षांची परंपरा आणि ते दसरा मेळावे माझ्या आजही लक्षात आहेत. पण असा मेळावा फार क्वचित झाला आहे. अभूतपूर्व आहे हे. मी भारावून गेलो आहे – उद्धव ठाकरे

19:50 (IST) 5 Oct 2022
उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात!

उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात!

19:46 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – “तुझा मुलगाही तुझ्या पक्षात आला नाही”, भास्कर जाधवांचं टीकास्र

शिवसेना सोडून १८ वर्ष झाली. पण सारखं मी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना सोडली म्हणे. अरे मेलास तू, तुला उद्धव ठाकरेंनी दोन वेळा पाडला. तुझ्या मुलाला दोन वेळा पाडला. तू पक्ष काढलास, त्या पक्षात तुझा मुलगाही आला नाही. मला फडणवीसांना एकच विचारायचं आहे. तुम्ही यांच्या तोंडून आज घाण बोलून घेत आहात. पण विधानपरिषदेच्या सभागृहात याच कोंबडीचोरानं म्हटलं होतं की भाजपा म्हणजे लुटारूंचा, दारुवाल्यांचा पक्ष असल्याचं म्हटलं होतं. आज तुमच्याकडे तो आल्यानंतर तो सज्जन झाला – भास्कर जाधव

19:44 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – भास्कर जाधवांचा नारायण राणेंवर खोचक टोला

खरंतर आज त्या कोंबडीवाल्याचा समाचार घ्यायचा होता. शिवसेना सोडल्यानंतर त्याची पुढची टोक तुटली आहे. पण कोंबडीला दोन तोंडं असतात. एक पुढचं टोक आणि एक मागचं तोंड. सारखं काहीतरी चालू असतं. हा अकलेचा कांदा, कोंबडीवाल.. याची कुंडली माझ्याकडे, त्याची कुंडली माझ्याकडे. तिकडे प्राप्तीकर विभागात शिपाई होतास. शिवसेनाप्रमुखांनी एवढं मोठ केलं, तरी शिपाई तो शिपाईच राहिला. मला तोंड उघडायला लावू नका म्हणे. खरंच तोंड उघडलं तर एवढं घाणेरडं आहे की याच्या तोंडून कधी चांगलं काही निघतच नाही – भास्कर जाधव

19:36 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – उद्धव ठाकरेंचं शिवाजी पार्कवर आगमन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं शिवाजी पार्कवरील व्यासपीठावर आगमन.. येताच गुडघ्यावर बसून व्यासपीठाला केला नमस्कार!

19:29 (IST) 5 Oct 2022
कायदा मला चांगला कळतो, कारण कायदा माझ्या बापानं लिहिलाय – सुषमा अंधारे

देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणालात कायद्याच्या चौकटीत बोला. पण तुम्ही त्याची काळजी करू नये. तुम्ही कायदा मोडायलाच बसला आहात. कायदा मला चांगला कळतो. कारण कायदा माझ्या बापानं लिहिला आहे. – सुषमा अंधारे

19:28 (IST) 5 Oct 2022
दीपक केसरकर, ‘त्या’ १० कोटींचा हिशोब कधी देणार? – सुषमा अंधारे

दीपक केसरकर, आपण फारच संयमानं बोलता. मुंबई ते गोवा जी टूर तुम्ही केली, तिचा सर्व हिशोब तुम्ही देणार होतात. त्याचा हिशोब तुम्ही अजून दिलेला नाही. संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नात मेहंदीवाल्याची, ब्युटी पार्लरवाल्याचीही चौकशी केली होती. आता बीकेसीच्या मैदानासाठी १० कोटी रुपये कुणाच्या खात्यातून खर्च केले? किरीट सोमय्या, १० कोटींची चौकशी कधी करणार ते आधी बघा – सुषमा अंधारे

19:26 (IST) 5 Oct 2022
आनंद दिघेंनी राम कापसेंना कसं पराभूत केलं, हे विसरलात का – सुषमा अंधारे

तुम्ही आनंद दिघेंचे वारसदार आहात? मग आनंद दिघेंनी राम कापसेला पराभूत करून काय पद्धतीने ठाण्याची जागा निवडून आणली होती हे विसरलात काय तुम्ही? तुमचं हिंदुत्व फक्त ईडीच्या कार्यालयात जागृत झालेलं हिंदुत्व आहे. तुम्ही वाट पाहात आहेत की सुषमा अंधारे किंवा आम्ही बोलणारे कशात सापडू. पण काळजी करू नका. तुम्ही एका संजय राऊतांवर कारवाई करू शकलात. पण शिवसेना विचार आहे. शिवसेना संपणारी नाही. शिवसेनेची पाळंमुळं घट्ट रुजली आहेत. पावसाली भूछत्रासारख्या उगवलेल्या माणसांनी शिवसेना संपेल, अशी वल्गना करू नये – सुषमा अंधारे

19:23 (IST) 5 Oct 2022
सुषमा अंधारेंचं शिंदे गटाला जाहीर आव्हान!

तुम्हाला एक आव्हान आहे. तुम्ही खरंच हिंदुत्ववादी असाल, तर कल्याणमधली श्रीकांत शिंदेंची जागा भाजपाला देऊन टाका. मुंबईतली प्रताप सरनाईकांची जागा भाजपाला देऊन टाका. शिरुरमधली आढळराव पाटलांची जागा भाजपाला देऊन टाका. त्याग काय ते तरी कळेल – सुषमा अंधारे

19:22 (IST) 5 Oct 2022
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 – तुम्ही हिंदुत्वाला कलंक लावला – सुषमा अंधारे

हिंदुत्वाला तुम्ही कलंक लावला. कारण हिंदू माणूस कुटुंब संकटात असताना पळून जात नाही, एकमेकांना आधार देतो – सुषमा अंधारे

19:19 (IST) 5 Oct 2022
रामदास कदम, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? – सुषमा अंधारे

रामदास कदम, शिवसेनेला ब्लॅकमिल करून राष्ट्रवादीत जाण्याची धमकी दिलीत, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? आम्ही काय बगलेत रेडिओ ठेवतो, धोतरावर इन करतो, कानात बिडी आहे का आमच्या? काय नाटक चाललंय हे? उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणजे काय इतर धर्माचा स्वीकार केला का? त्यांनी नुपूर शर्मासारखी थिल्लर वक्तव्य केली नाही, ही त्यांची चूक आहे का? – सुषमा अंधारे

शिवसेना आणि दसरा मेळावा (संग्रहित फोटो)

Uddhav Thackeray Dasara Melava 2022 Live News : शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मोठी गर्दी!

Next Story
मुंबई : ‘हर हर महादेव’ चित्रपटातील ‘वाह रे शिवा’ गाणे प्रेक्षकभेटीला

संबंधित बातम्या

“दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा”, संजय राऊतांच्या टीकेला आपचं प्रत्युत्तर, म्हणाले, “सतत ‘डील’…”
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का? उदयनराजेंनी दिलं उत्तर, म्हणाले “भाजपाने त्यांना…”
यात्रा व जत्रांना परवानगी कधी? सांस्कृतिक राज्यमंत्री सांगतात…
आमदारांच्या नाराजीची दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती ; शिवसेनेचे बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांची प्रतिक्रिया 
‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले अन्…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आता पोलीस हवालदारपदासाठी तृतीयपंथीयांनाही अर्ज करणे शक्य
Himachal Pradesh Election 2022 : काँग्रेसपुढे नेतानिवडीचा पेच; मुख्यमंत्रीपदावर तिघांचा दावा
अनुराग ठाकूर यांच्या जिल्ह्यात सर्व जागांवर भाजप पराभूत!; प्रेमकुमार धुमल यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी
शरद पवारांसह राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे?
India Bangladesh 3rd ODI : बांगलादेशविरुद्ध सपशेल अपयशाची नामुष्की टाळण्याचे भारताचे लक्ष्य!