मुंबई : लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष हा शिंदे गटाचा दावा हास्यास्पद असून केवळ निवडून आलेले लोक म्हणजे पक्ष असेल, तर उद्या उद्योगपती पंतप्रधानही होतील, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. शिंदे गटाला मी शिवसेना मानतच नसून पळपुटय़ांना पक्षावर दावा सांगण्याचा अधिकारच नसल्याची टीका ठाकरे यांनी केली. निवडणूक आयोगाने लोकशाहीचे रक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
खरी शिवसेना कोणाची आणि हे पक्ष नाव व धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार, या मुद्दय़ावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढील सुनावणी काही दिवसांपूर्वी पूर्ण झाली असून निकालाची प्रतीक्षा आहे. तर सर्वोच्च न्यायालयातील पाचसदस्यीय घटनापीठापुढे बंडखोर आमदारांची अपात्रता, राज्य सरकारची वैधता आदी मुद्दय़ांवर १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर टीकास्त्र सोडले.
शिवसेना एकच आहे व एकच राहणार, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, शिंदे गटातील १६ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरविण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी आपला निर्णय देऊ नये. शिंदे गटाला पक्षाची घटनाच मान्य नाही. पक्षाच्या घटनेत प्रमुख नेता हे पदच नसून आम्ही आयोगाच्या सर्व नियमांचे पालन केले आहे. आयोगाने परवानगी दिल्यावर पक्षांतर्गत निवडणुकाही घेतल्या जातील. अंधेरीची निवडणूक लढणार नव्हते, तर आमचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह का गोठविले, असा सवाल ठाकरे यांनी केला. सर्वोच्च न्यायालयावर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न होत असून हे आरोग्यदायी लोकशाहीचे लक्षण नाही, असे ठाकरे यांनी नमूद केले.