मुंबई : शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता निर्णायक टप्प्यात आहे. न्यायालयाचा निर्णय आपल्याच बाजूने लागेल. तेव्हा पुढील निवडणुकींच्या तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना शनिवारी दिले.
शिवसेना भवन येथे जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीत ठाकरे बोलत होते. बैठकीत पक्षसंघटना, आगामी निवडणुका आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर देत ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आतापासूनच २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.
बैठकीत पक्षबांधणीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना देताना अधिकाधिक कार्यकर्ते आणि नव्या चेहऱ्यांना पक्षाशी जोडण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेऊन तळागाळातील संघटना अधिक सक्षम करण्याचे निर्देशही देण्यात आले. संघटनात्मक कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याचा इशाराही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
जबाबदारी प्रभावीपणे पार पाडता येत नसेल, तर संबंधितांनी पदाचा आग्रह धरू नये. अशा पदाधिकाऱ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार अन्य जबाबदारी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मतदार नोंदणीशी संबंधित विशेष नोंदणी मोहिमेवर लक्ष केंद्रीत (एसआयआर) करा. ८ ऑगस्टपर्यंत पात्र मतदारांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्हा आणि विभागात प्रभावी मोहीम राबविण्याचे आदेशही त्यांनी दिले. एकाही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केली.
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबतचा वाद गेली चार वर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने लागेल आणि शिवसेना पक्ष तसेच ‘धनुष्यबाण’ चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चिन्ह आपल्याला मिळाले नाही, तर ते गोठविले जाईल, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
