मुंबई: कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपला महापौर पदापासून दूर ठेवण्यासाठी बुधवारी शिवसेनेने (एकनाथ शिंदे) मनसेला बरोबर घेतले. स्थानिक पातळीवरील नेत्यांकडून हा निर्णय घेण्यात आल्याची सारवासारव मनसेकडून करण्यात आली असली तरी शिंदेंबरोबर जायचे होते, तर युती कशासाठी केली असा सवाल शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला होता. यासंदर्भात शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली.

कल्याण-डोेंबिवलीत महापौरपदासाठी ६५ चे बहुमत असून यासाठी ठाकरेंबरोबर युतीत लढलेल्या मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. कोकण विभागीय आयुक्तांसमोर गट स्थापन करीत शिंदेसेनेने ५३, तर मनसेने ५ नगरसेवकांची नोंदणी केली. त्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला. यावर शिंदेसेनेसोबत जायचे होते तर आमच्यासोबत युती करायची नव्हती अशा शब्दात राऊत यांनी टीका केली. या घडामोडींसदार्भात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत नेमके काय घडले याची माहिती देण्यात आली नसली तरी संजय राऊत आणि राज ठाकरे यांची कल्याण डोंबिवलीतील घडामोडींवर चर्चा झाल्याचे समजते. त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी २३ जानेवारी रोजी माटुंगा येथे षण्मुखानंद सभागृहात साजरी करण्यात येणार आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाबाबतही दोघांमध्ये चर्चा झाली.

यासंदर्भात राऊत म्हणाले, कल्याण-डोंबिवलीत जो निर्णय झाला, त्याबाबत राज ठाकरे पूर्णपणे अनभिज्ञ होते. या निर्णयामुळे ते स्वत: व्यथित झाले. ठाकरे गट शिंदे गटाबरोबर कधीही जाणार नाही. इतर काही पर्याय असतील, तर त्याबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण कोणीही परस्पर निर्णय नाही. श्रीकांत शिंदे, राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांच्यात दोन बैठका पार पडल्याची माहिती उद्धव ठाकरेंनाही होती. आताही पडद्यामागे काय सुरू आहे, याची माहिती मला आहे. अशा प्रकारची कोणतीही युती मराठी माणूस मान्य करत नाही. शिंदेंना धडा शिकविण्यासाठी आम्हाला यश मिळाले असून मराठी माणूस दुखावला जाईल, असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.