“ उद्धव ठाकरे हे असं व्यक्तिमत्व आहे की जे कधी आयुष्यात हरले नाही आणि हरणार देखील नाहीत. कधी थांबले नाहीत आणि कधी थांबणार देखील नाहीत. त्यांच्यासोबत हे पहिल्यांदा घडत नाहीए. अशी अनेक आव्हानं आलेली आहेत. सर्वात मोठं संकट करोना आणि त्यांची शस्त्रक्रिया. एवढी मोठी शस्त्रक्रिया होऊन देखील महिनाभराच्या आत त्यांनी राज्याची धूरा हाती घेतली होती आणि सर्वांना काम करण्यास प्रोत्साहन दिले.” अशा शब्दांमध्ये पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.

राज्यतील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीतन अनेक महत्वपूर्ण निर्णय तातडीने घेतले गेले. नामांतराचे प्रस्ताव देखील मंजूर केले गेले. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.

सुनील केदार म्हणाले, “ आम्ही लोकांनी जे काम केलं त्याबद्दल आभार मानले गेले. कोणी जर आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करत असेल, तर त्याचे आभार मानावेच लागतात.”

तसेच, “ दोन वर्षे महाराष्ट्राने करोनाशी जो लढा दिला. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे सर्वांनीच कौतुक केलं आहे. न्यायालयाकडून देखील त्यांचे कौतुक केले गेले आहे. दोन वर्षांत त्यांनी राज्यभरातील जनतेसोबतच अन्य राज्याली लोकांची देखील काळजी घेतली. प्रशासकीय कामांचा काही अनुभव नसतानाही त्यांनी योग्यप्रकारे राज्य चालवलं, एवढ्या मोठ्या संकटाला सामोरे गेलं. अशा व्यक्तीसोबत जर छळ-कपट होत असेल, तर या राज्यातील जनता याबाबत विचार करेल की नाही? हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो.” असंही सुनील केदार म्हणाले.