मुंबई : ‘आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असे सूचक वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याने महापौररपदाच्या निवडणुतकीच्या निमित्ताने राजकीय तर्कवितर्क व्यक्त करण्यात येऊ लागले.
शिवसेना ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक निवडून आले. या विजयानंतर नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मातोश्री येथे जमलेल्या नगरसेवक व शिवसैनिकांसोबत संवाद साधताना त्यांनी महापौरपदाबाबत भाष्य केले. विजयाचे श्रेय शिवसैनिकांना देताना आपण निमित्तमात्र असल्याचे त्यांनी सांगितले. लढाई सोपी नव्हती. भाजपला वाटले की आपण शिवसेना संपवली. मात्र त्यांनी कागदावरची शिवसेना संपवली. ते जमिनीवरची शिवसेना संपवू शकले नाहीत. त्यांनी लालूच, साम दाम दंड भेद सर्व काही वापरले. गद्दारही घेऊन गेले. मात्र ते निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत. तुमच्या निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो. आता आपली जबाबदारी वाढलेली आहे, असे ठाकरे म्हणाले.
यावेळी शिंदे सेनेच्या विजयावर बोलताना गद्दारी करून मुंबई गहाण ठेवण्यासाठी हा विजय मिळवला आहे. त्यांना मुंबईकर मराठी माणूस माफ करणार नाही, अशी टीका त्यांनी केली. आपल्याकडे तन आणि मन आहे त्यांच्याकडे फक्त धन आहे, मात्र आपल्याकडे जी शक्ती आहे त्याच्या जोरावर आपण त्यांना घाम फोडला आहे. ही एकजूट अशीच ठेवा जेणेकरून तुमच्या पुढच्या पिढ्यांना तुमचा अभिमान वाटेल, असे आवाहन ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.
आमच्या पराजयाला तेज, त्यांचा विजय डागाळलेला
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकांबाबत भाष्य केले. पराभव झाला आहे असे वाटतच नसल्याचे ते म्हणाले. आमच्या पराजयाला तेज आहे, त्यांचा विजय डागाळलेला आहे. भाजपाची मानसिकताच वापरा आणि फेकून द्या अशी आहे. ज्यांना बरोबर घेतले आहे त्यांनाही संपवणार आहेत अशी टीका त्यांनी केली. सर्व महापालिकांच्या प्रचाराला आपण जाऊ शकलो नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मुंबई, ठाणे, आणि छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी गेलो. जिथे जाऊ शकलो नाही त्या सगळ्या शिवसैनिक आणि मतदारांची मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले. मुंबईत आमचा महापौर व्हावा अशी इच्छा होती, आजही आहे. पण ती संख्या आम्ही गाठू शकलो नाही. पण या सगळ्या खेळाला उत्तर देऊन जे यश मिळालंय त्यामुळे त्यांना घाम फोडलाय हे नक्की असे समाधान त्यांनी व्यक्त केले.
भाजप कागदावरचा पक्ष
भाजपा हा पक्ष कागदावरच आहे पण जमिनीवर नाही. कारण तो असता तर त्यांना यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता, नेते फोडावे लागले नसते, अशी टीका करताना मुंबईकरांकडून अजून अपेक्षा होती. कोविड काळातही चांगले काम केले होते. मुंबईकर भरघोस आशीर्वाद देतील असे वाटले होते. तरीही जे दिले ते भरपूर दिले अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
शिवसेना भवनचा वॉर्ड जिंकून आणला
शिवसेना भवन वॉर्ड आम्ही जिंकून आणला, मनसे शिवसेना कोणाला कोणाची मदत झाली असे नाही. आम्ही एक दिलाने लढलो. एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत शिवसेना-मनसे युतीवरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. काँग्रेस तुमच्यासोबत असती तर, असा प्रश्न विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, तुमच्यासोबत असते तर म्हणजे आत्याला मिशी का नाही? असे विचारण्यासारखे आहे, अशी मिश्कील टिपणी त्यांनी केली. मुंबईत ५४ नगरसेवक फोडले, तरीही ६५ नगरसेवक निवडून आले. पक्ष आणि चिन्ह यावर सर्वोच्च न्यायालयात २१ आणि २२ जानेवारीला सुनावणी आहे. त्यावेळी जर संविधानिक निकाल लागला तर शिंदेंचे अस्तित्वच संपेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई लुटणाऱ्यांचा भंडाफोड करणार
महापालिकेमध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी सभागृहात गेल्यानंतर मुंबई महापालिकेची तिजोरी कोणी-कशी लुटली, कसे गैरव्यवहार झाले, याचा भंडाफोड करण्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. शिवसेना, मनसे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी हे काम करतील. आम्ही वचननामा जनतेसमोर ठेवलाय त्याचा सुद्धा पाठपुरावा करणार अशी ग्वाही देत मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल याचे दडपण आम्ही या मुंबई लुटणाऱ्यांवरती ठेवणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
