सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे; पहिल्या पाचात भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याला स्थान नाही

 ‘इंडिया टुडे’ आणि ‘सी व्होटर’ या संस्थेने ‘मुूड ऑफ नेशन २०२०२’ या अंतर्गत  सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्रिपदासाठी केलेल्या सर्वेक्षणात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना पहिल्या क्रमांकाची पसंती मिळाली.

पहिल्या पाचात भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याला स्थान नाही

मुंबई: ‘इंडिया टुडे’ समूहाने केलेल्या सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाचांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चौथे स्थान मिळाले आहे. पहिला क्रमांक ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पटकविला असला तरी पहिल्या पाचांमध्ये भाजपशासीत एकाही राज्याच्या मुख्यमंत्र्याला स्थान मिळालेले नाही.

 ‘इंडिया टुडे’ आणि ‘सी व्होटर’ या संस्थेने ‘मुूड ऑफ नेशन २०२०२’ या अंतर्गत  सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्रिपदासाठी केलेल्या सर्वेक्षणात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना पहिल्या क्रमांकाची पसंती मिळाली. ओडिशातील २,७४३ पैकी ७१ टक्के लोकांनी पटनायक यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या असून, त्यांना ४९८२ पैकी ६९.९ टक्के लोकांनी पंसती दिली. तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, चौथ्या क्रमांकावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर पाचव्या क्रमांकावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे आहेत. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अर्रंवद केजरीवाल, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व सरमा आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा क्रमांक लागतो. या सर्वांना एकूण सर्वेक्षण केलेल्या नागरिकांपैकी ५० टक्के नागरिकांनी त्यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले होते.

विशेष म्हणजे या यादीत भाजपशासीत राज्यांपैकी एकाही मुख्यमंत्र्याचा पहिल्या पाचामध्ये समावेश नाही. आसामचे भाजपचे मुख्यमंत्री सरमा हे सातव्या क्रमांकावर आहेत. अन्य भाजपशासीत राज्यांचे मुख्यमंत्र्यांचा क्रमांक त्यानंतर लागतो.

उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा चेहरा पुढे करीत पुन्हा सत्ता मिळविण्याची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपविली आहे. परंतु या सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ यांचा क्रमांक फारच तळाला आहे. योगींना सर्वेक्षण झालेल्यांपैकी ४० टक्क्यांच्या आसपाल लोकांनीच पसंती दिली आहे. निवडणूक होत असलेल्या गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कामगिरीबद्दल फक्त २७ टक्के लोकांनीच समाधान व्यक्त केले. कर्नाटकात सत्ताबदल करून भाजपने बसवराज बोम्मई यांच्याकडे सूत्रे सोपावून आगामी निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचे जाहीर केले असले तरी त्यांचीही कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याचे सर्वेक्षणातून आढळले.

  भाजपचा सवाल

 गेल्या सव्वादोन वर्षांपासून मंत्रालयात न फिरकलेले उद्धव ठाकरे हे सर्वोकृष्ट मुख्यमंत्री कसे काय ठरले, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ ते घरातच बसून आहेत. फारसे सक्रिय नाहीत. मग कोणत्या निकषांवर त्यांना स्थान मिळाले, अशी शंकाही पाटील यांनी घेतली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray in the list of the best chief minister chief minister uddhav thackeray fourth place akp

Next Story
सरनाईक यांना व्यक्तिगत लाभ देऊन शपथेचा भंग; मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची भाजपची राज्यपालांकडे मागणी 
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी