लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई- ठाण्यातील संथ मतदानावरून निवडणूक आयोगावर टीका- आरोप केल्याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागवला आहे. त्यात ठाकरे यांचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाल्यास ठाकरे यांच्यावर उचित कारवाई केली जाणार असल्याची माहिती आयोगातील सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पाचव्या टप्यात २० मे रोजी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यांत मतदान पार पडले होते. त्यावेळी अनेक मतदारसंघात विशेषत: मुंबई, ठाण्यात संथ मतदानामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी तीव्र उन्हाळा असूनही मतदारांसाठी आयोगाने कोणतीही व्यवस्था केली नसल्याचा आरोप करीत अनेक ठिकाणी मतदारांनी आपला संताप व्यक्त केला होता. त्याच दिवशी दुपारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर जोरदार आरोप केले होते.

मतदारांचा शिवसेनेला (ठाकरे गट) भरघोस प्रतिसाद मिळत असलेल्या वसाहतींमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून मतदानाला दिरंगाई केली जात होती. कडाक्याच्या उन्हात बराच वेळ रांगेत उभे राहिल्याने निराश मतदार माघारी गेले. वेगवेगळे पुरावे मागून मतदारांचा छळ केला गेला. निवडणूक आयोगाचे अधिकारी पक्षपातीपणे वागले असून आयोगाने मोदींच्या घरगड्यासारखे काम केल्याचा आरोप ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. तसेच यावेळी त्यांनी,पराभवाच्या भीतीने पछाडलेल्या भाजपने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विरोधकांच्या मतपेटी क्षेत्रात कमी मतदानाचा ‘खेळ’ खेळल्याचा आरोपही त्यांनी भाजपावर केला होता. ठाकरे यांच्या या आरोपावर नाराजी व्यक्त करीत मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. शेलार यांच्या पत्रानंतर आयोगाने ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा तपशील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयांकडून मागविला होता.

हेही वाचा >>>मुंबई: बेलासिस उड्डाणपूल सोमवारपासून बंद

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या तपशिलानंतर आयोगाने ३ जून रोजी ठाकरे यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या भागात खरोखरच मतदान संथ होते का, मतदारांच्या रांगा लागल्या होत्या का, याबाबत वेगवेगळे पुरावे मागून मतदारांची अडवणूक केली जात होती का आदी मुद्द्याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय होती याबाबत हा अहवाल मागविण्यात आला आहे.

कारवाईचे संकेत

जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आल्यावर ठाकरे यांच्या आरोपात खरोखरच तथ्य होते की त्यांनी केवळ आयोगाला बदनाम करण्यासाठी हे आरोप केले याची शहानिशा केली जाणार आहे. ठाकरे यांनी केवळ राजकीय भूमिकेतून आयोगावर हेत्वारोप केल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्याविरोधात नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती आयोगातील अधिकाऱ्याने दिली.