मुंबई : दसरा मेळाव्याची शिवसेना व शिंदे गटाने जय्यत तयारी सुरू केली आहे. जास्तीत जास्त गर्दी कशी होईल या दृष्टीने उभय बाजूने प्रयत्न केले जात आहेत. मेळाव्याच्या तयारीसाठी शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत शिंदे यांना लक्ष्य करण्यात आले, तर शिंदे गटाच्या चित्रफितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांचा हवाला देत शिवसेनेला टोला लगाविण्यात आला आहे.  दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी शिवसेना भवनात बैठकांचे सत्र सुरू होते. पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिवाजी पार्क मैदानात जाऊन तयारीची पाहणी केली. शिंदे गटानेही वांद्रे-कुर्ला संकुलातील सभास्थळी जोरदार तयारी सुरू केली आहे.

हवामान खात्याने गेल्या आठवडय़ात दसरा व त्याच्या आधी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. परिणामी दोन्ही गटांमध्ये अस्वस्थता होती; पण बुधवापर्यंत पाऊस नसल्याचा अंदाज आता हवामान विभागाने व्यक्त केल्याने शिवसेना व शिंदे गटाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.  सभेच्या तयारीकरिता शिवसेनेच्या वतीने नवीन चित्रफीत सादर करण्यात आली. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जुन्या भाषणांचा हवाला देण्यात आला आहे. ठाकरे कुटुंब संपविण्यास काही जण निघाले आहेत, असे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा त्यात समावेश आहे. तर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणाची चित्रफीत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रसिद्ध केली. त्यात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार शरद पवार यांनी पाडले होते या बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा उल्लेख करण्यात आला आहे.  गेले आठवडाभर चित्रफितीच्या माध्यमातून दोन्ही बाजूने परस्परांवर चिखलफेक केली जात आहे.