मुंबई : सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र विजयी मेळावा घेणार आहेत. मोर्चा रद्द झाल्यानंतर आता ५ जुलै रोजी विजयी मेळाव्याच्या माध्यमातून दोघे बंधू एकत्र येणार असून दादरच्या शिवाजी पार्क येथे हा मेळावा होण्याची शक्यता आहे. हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. शिक्षणाच्या विषयात अर्थतज्ज्ञांची समिती नेमली असली तरी कोणत्याही परिस्थितीत हिंदी सक्ती होऊ देणार नाही असा इशारा ठाकरेबंधूंनी दिला.
हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्याने याविरोधात पुकारण्यात आलेला मोर्चा रद्द झाला. मोर्चा रद्द झाल्यानंतर आता हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानिमित्त विजयी मेळावा घेण्याचे उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहीर करण्यात आले. याबाबत शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दूरध्वनी करून या मेळाव्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. याची माहिती स्वत: राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. हा मेळावा होणार असला तरी त्यात कोणतेही पक्षीय लेबल लावाचे नाही. हा मराठी माणसाचा विजय आहे, त्यामुळे मेळावा मराठी माणसाचा आहे. मराठी भाषा या विषयावर कोणकडूनही तडजोड हाेता कामा नये यासाठी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठी माणसांच्या एकजुटीनंतर सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला. पण तरीही सरकारने शिक्षणाच्या विषयात अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांची समिती नेमून शिक्षणाची थट्टा सुरु केली आहे. त्यामुळे कोणाचीही समिती बसवली तरी आता महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांना ठणकावले. दरम्यान, ५ तारखेला विजयोत्सव साजरा केला जाणार असून कालच्या आंदोलनात पक्षभेद विसरून सर्व एकत्र आले होते. तीच एकजूट विजयोत्सवात दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. सर्व बाजूने तो रेटा आला. गरज नसताना विषय आले. हा विषय श्रेयवादाचा नाही. सरकार पुन्हा या वाटेला जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. मराठीच्या विषयात कोणतीही तडजोड होणार नाही. महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे काम सुरु आहे. हे थांबयला पाहिजे, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
हळूहळू विष पसरवण्याचा प्रयत्न
दादा भुसे आल्यावर म्हणाले की ऐकून घ्या. ऐकून घेणार पण ऐकणार नाही. या विषयात तडजोड नाही. हे समाजात हळूहळू विष पेरण्यासारखे आहे. समिती नेमली तरी हे परत होणार नाही हे लक्षात घ्यावे. आमच्या अभ्यासात पाचवीपासून हिंदी-संस्कृत विषय होते. आम्हीही शिकलोच. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही तर प्रांतभाषा आहे. उत्तर भारतातील अनेक लोक जर महाराष्ट्रात नोकरीसाठी येत असतील तर तिथे त्यांनी मराठी शिकवायला हवे. १५० वर्षे जुनी भाषा ३ हजार वर्षे जुन्या भाषेला मारत असेल तर असे होणार नाही, असे त्यांनी ठणकावले.
सरकारमधले मराठीप्रेमी मोर्चात सहभागी झाले असते – उद्धव ठाकरे
सरकारला सुचलेल्या शहाणपणामुळे तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. पण जर का त्यांनी तो जीआर रद्द केला नसता तर पाच तारखेच्या मोर्चात आमच्यासहित भाजप, एसंशि, अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी सहभागी होणार होते, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. मराठी-अमराठी करायचे, फूट पाडायची, हा सरकारचा कुटिल डाव होता. पण फूट पडत नाही आणि मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून जीआर रद्द करावा लागला, असे ते म्हणाले.
मराठी माणूस विखुरलेला आहे म्हटल्यावर मराठीद्रोही पुन्हा डोके वर काढत आहेत. मराठी माणसाच्या एकजुटीने हे डोके चिरडले गेले असले तरी पुन्हा फणा येऊ यासाठी संकटाची वाट बघण्यापेक्षा आपली एकजूट कायम ठेवली पाहिजे, असे आवाहन करत या एकजूटीचे दर्शन येत्या ५ तारखेला घडवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही ठाकरेंनी व्यक्त केला.
‘कमळी’ला १०० गुण कसे मिळाले?
वृत्तपत्रातील मराठी मालिकेच्या एका जाहिरातीचा आधार घेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ‘कमळी’ला मार्क मिळाले शंभर, कमळी आमची एक नंबर, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ते म्हणाले, मला उत्सुकता आहे की कमळी कोणत्या भाषेतून, कोणत्या शाळेत शिकली. कारण तिच्यावर भाषेची सक्ती होती काय, तिने शंभर मार्क कसे मिळवले, कि त्यामध्ये ईव्हीएम वापरले होते? असा टोलाही त्यांनी लगावला.