मुंबई : मोबाईलच्या आहारी गेलेल्या समाजाला आज विचार करायलाही वेळ उरलेला नाही. सततच्या घडामोडी, प्रश्न आणि आंदोलनांच्या आवर्तनात माणसाची विचारशक्तीच मारली जात आहे. वाचन, चिंतन आणि मननाची जागा मोबाईलने घेतली आहे, अशी खंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

दादर येथील ब्राम्हण सहाय्यक संघामध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र आदी मान्यवर या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या पत्रकारितेतील प्रवासातील अनेक आठवणी सांगत त्यांच्या लेखनशैलीचे कौतुक केले. घोषणा देणे आणि एखाद्या विषयाच्या अंतरंगात जाऊन त्याचा वेध घेणे यात फरक आहे. संजय राऊत यांना विषयाच्या मुळाशी जाण्याची आणि त्यानंतर आपल्या शब्दांतून तो वाचकांच्या मनापर्यंत पोहोचवण्याची कला अवगत आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, अक्षरांचे शब्द होतात, शब्दांच्या ओव्याही होतात आणि शिव्याही होतात. या दोन्हींचे सामथ्र्य संजय राऊत यांच्या लेखणीत आहे. कोणाला ओव्या द्यायच्या आणि कोणाला शिव्या, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे, असेही ठाकरे म्हणाले.

आजच्या पिढीचे वाचन कमी होत असून मोबाईलवरील अवलंबित्व वाढले आहे. भविष्यात अक्षर आणि पेन संग्रहालयात जातील की काय, अशी शंका वाटते. मात्र, त्याहून गंभीर बाब म्हणजे माणसाची विचार करण्याची शक्तीही हरवत चालली आहे. सततच्या घडामोडी आणि विविध प्रश्नांचा मारा करून माणसाला विचार करायलाच वेळ दिला जात नाही. मराठी भाषेचा आग्रह धरताना शुद्ध आणि अर्थपूर्ण मराठीचा वापरही तितकाच महत्त्वाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचे वैशिष्ट्य सांगताना ठाकरे म्हणाले, या पुस्तकाला अनुक्रमणिका नाही. कोणतेही पान उघडले तरी त्यातील मोजक्या ओळींमध्ये मोठा आशय सामावलेला आहे. पूर्वी जात्यावर दळताना ओव्या रचल्या जात. आता जातं गेले, ओव्याही गेल्या आणि जातिवाचक शिव्या मात्र शिल्लक राहिल्या, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सततच्या संघर्षात आणि आंदोलनांत गुंतलेल्या समाजाला वाचनासाठी वेळ मिळत नसल्याचे सांगत त्यांनी विविध प्रकल्पांविरोधातील आंदोलनांचा संदर्भ दिला. दुसरीकडे, ज्येष्ठ पत्रकार अमरीश मिश्रा यांच्यासारखी व्यासंगी आणि अनुभवसंपन्न पत्रकार मंडळी कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. संजय राऊत यांनी तुरुंगवासाच्या कठीण काळातही चिंतन, मनन करून लेखन केले. तुरुंगवास हा विपश्यनेप्रमाणे अनुभवत त्या प्रतिकूल परिस्थितीतही स्वर्ग शोधण्याची क्षमता संजय राऊत यांच्यात आहे. ‘बोध कीर्तन’ हे पुन्हा पुन्हा वाचावे असे पुस्तक असून, त्यातील कधी लढायचे आणि कधी थांबायचे, हा बोध जीवनात उपयोगी पडणारा आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या लेखनाचे कौतुक केले.

काही कारणांनी काही जणांशी संवाद थांबला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि माझे फोनवर बोलणे थांबले अशी खंत व्यक्त केली होती. हा धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी, बाळासाहेब ठाकरे ज्याप्रमाणे अमरीश मिश्रा यांना फोन करायचे, त्याचप्रमाणे आपणही त्यांच्याशी संवाद साधत होतो. यावेळी काही कारणांनी काही जणांशी संवाद थांबला; मात्र अमरीश यांच्याबरोबर थांबलेला फोन पुन्हा सुरू झाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले.

बाळासाहेबांना संजय राऊत आवडत नव्हते – राज ठाकरे

शिवसेनेवर टीका करणारे लेख लिहित असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सुरुवातीला संजय राऊत आवडत नव्हते. मात्र, स्वतःवर बाळासाहेबांनी केलेली टीका आणि दिलेल्या शिव्याही न लपवता संपूर्ण मुलाखत प्रसिद्ध करण्याचे धाडस राऊत यांनी दाखवले. त्यांच्या या प्रामाणिक पत्रकारितेमुळे बाळासाहेबांचे त्यांच्याबद्दलचे मत बदलले आणि पुढे तेच राऊत ‘सामना’चे संपादक झाले, असा जुन्या आठवणींना उजाळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. राऊत ‘लोकप्रभा’मध्ये काम करत असताना गँगवॉरमधील सत्य घटनांवर आधारित लेखनामुळे चर्चेत होते. पुढे त्यांनी शिवसेनेवर टीका करणारे लेख लिहिल्याने बाळासाहेब त्यांच्यावर नाराज होते. एकदा राऊत यांनी ‘लोकप्रभा’साठी बाळासाहेबांची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली. आपण बाळासाहेबांना याबाबत विचारले असता त्यांनी सुरुवातीला स्पष्ट नकार दिला. मात्र, वारंवार आग्रह केल्यानंतर त्यांनी मुलाखतीला संमती दिली, असे राज यांनी सांगितले. दरम्यान, संजय राऊत यांनी तुरुंगात असताना अनुभवलेले, मनात आलेले आणि भासलेले अनेक विषय या पुस्तकात मांडले आहेत. अशा प्रकारचे पुस्तक तुरुंगातच निर्माण होऊ शकते, असे सांगतानाच राऊत यांनी यापुढेही अनेक चांगली पुस्तके लिहावीत; मात्र ती तुरुंगात नव्हे, तर बाहेर राहून लिहावीत, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त करताच सभागृहात हास्यस्फोट झाला.

तुरुंगातील काळ लेखकांसाठी सर्जनशीलतेचा – संजय राऊत

पुस्तक सोहोळ्यात प्रास्तविक करताना पुस्तकाचे लेखक संजय राऊत म्हणाले, लेखकांना काही काळ तुरुंगात पाठवायला हवे. कारण जगभरातील अनेक उत्तमोत्तम साहित्यकृतींची निर्मिती तुरुंगातच झाली आहे. मलाही तुरुंगात १०५ दिवस काम नसल्याने वाचन, चिंतन आणि लेखनासाठी वेळ मिळाला. या काळात अनेक विषयांवर विचार करून लेखन करता आले, असे मिश्कील विधान राऊत यांनी केले. पुस्तकाच्या ‘बोध कीर्तन’ या नावावर काहींना वाटते की राऊत आध्यात्मिक कसे असू शकतात? परंतु, वक्त्याकडे सांगण्यासारखे काही असेल तरच तो उत्तम कीर्तन करू शकतो आणि अशाच कीर्तनकाराला जास्त श्रोते लाभतात, असे सांगतानाच दररोज सकाळी १० वाजता आपण किर्तन करत असल्याचे म्हणत त्यांनी चांगली फटकेबाजी केली. तुरुंगातील अनुभव, वाचनातून मिळालेले विचार आणि विविध विषयांवरील चिंतन यातून या पुस्तकाची निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले. वीर सावरकर, लोकमान्य टिळक, मॅक्सिम गॉर्की, स्टालिन आणि लेनिन यांच्यासारख्या व्यक्तींचे साहित्य तुरुंगात निर्माण झाले. तुरुंगातील काळ हा लेखकांसाठी सर्जनशीलतेला चालना देणारा ठरू शकतो, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात खाद्य आणि कपड्यांच्या उत्सवांप्रमाणे पुस्तकांचाही उत्सव साजरा व्हावा. मराठी साहित्याच्या विविध प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा साहित्यिक उपक्रमांची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. तसेच पंतप्रधान मोदी हे माझे व्यक्तिगत शत्रू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.