मुंबई: मुंबई महपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २० वर्षांनंतर एकत्र शिवाजीपार्कवर जाहीर सभा घेतली. त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त २३ जानेवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यावेळी एका व्यासपीठावरून ठाकरेबंधू कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला (ठाकरे) ६५ तर मनसेला ६ अशा एकूण ७१ जागा मिळाल्या. महापालिकेत सत्ता येणार नसली तरी मराठी माणसाने ठाकरेबंधूंना या निवडणुकीत साथ दिल्याने हा आकडा गाठता आला. राज ठाकरे यांनी शिवाजीपार्क येथे केलेल्या सादरीकरणाचा परिणाम मराठी माणसांची एकगठ्ठा मते ठाकरेंना मिळण्यात झाला. या निवडणुकीनंतर दोघांकडून समाधान व्यक्त करताना आपल्या नगरसेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात. त्यामुळे निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंची रणनीती काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. २३ जानेवारी रोजी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेबंधूंचे मार्गदर्शन होणार असल्याने पुढील काळात ठाकरेंची रणनीती काय असणार याचा उलगडा दोघांच्याही भाषणातून होण्याची शक्यता आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शिवसेना (ठाकरे) आणि मनसे हे दोन्ही पक्ष संयुक्तरीत्या या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ आठवणींचा नाही तर विचारांचा आहे, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. या सोहळ्यानिमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात, यावर दोघांच्या युतीची पुढील दिशा ठरेल.
