मुंबई: राम मंदिरासाठी केलेले दान गेले कुठे? राममंदिर लुटले जात असे तर हिंदू कधीही माफ करणार नाही. शिवसेनेने राम मंदिराला दिलेली चांदीची वीट कुठे गेली ? रामरक्षा आंदोलन ही भरपावसात पेटलेली ठिणगी आहे. जोपर्यंत या चोरीचा निष्पक्षपातीपणे निकाल लागला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. अयोध्या झांकी असेल तर काशी, मथुरा किती लुटतील, असा खडा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच आम्हाला भाजपमुक्त राम हवाय, अशी भूमिकाही मांडली.
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान चोरीविरोधात उद्धव ठाकरे यांनी पुकारलेल्या ‘रामरक्षा’ आंदोलनाची हाक उद्धव ठाकरे यांनी दादर येथील हनुमान मंदिरातील महाआरती, रामरक्षा पठण, हनुमानचालिसा, हनुमान स्तोत्र पठणाच्या माध्यमातून दिली. हनुमान मंदिराशेजारीच असलेल्या व्यासपीठासमोर भरपावसात जमलेल्या शिवसैनिकांच्या गर्दीला उद्देशून त्यांनी हे आंदोलन गावागावात पोहोचवून मंदिरा मंदिरात रामरक्षा पठण करून भाजपला जाब विचारण्याचे आवाहन केले.
बारा वर्षे झालीत, ज्यासाठी मेहनत केली होती.ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली आणि बसल्यानंतर कट्टर, कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला नष्ट करण्यासाठी जणू काही अफजलाखानी विडा उचलला, का उचलला कारण हिंदुत्वाचा गैरफायदा घ्यायचा होता, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. देशात शिवसेना केवळ एकमेव पक्ष आहे जो निधड्या छातीने सरकारला प्रश्न विचारतोय. राम मंदिर उभारणीसाठी अडवाणी यांनी पुकारलेल्या आंदोलनावेळी ॲअयोध्या तो झांकी है, काशी मुथरा बाकी है, असे ब्रीदवाक्य होते. मात्र आता भीती वाटायला लागली, ही अयोध्येची झांकी असेल तर काशी मथुरा किती लुटतील, असा सवाल त्यांनी केला.
हिंदूंना लुटणारं सरकार तिथे बसलेय हे आपले दुर्भाग्य आहे. पहिली सुरुवात शंकराचार्यांनी केली, केदारनाथातील सोने लुटले गेले. मध्यप्रदेशातील मुख्यमंत्र्यांवर उज्जैनमधील जमीन लुटल्याचे आरोप झाले. बद्रीनाथमध्ये पण चोरीच्या बातम्या येत आहेत. अयोध्येत एक आयएएस ऑफिसर बोलतात, आईचे सोन्याचे दागिने वितळवले आणि एक किलोचा सोन्याचे मुलामा असलेले रामचरितमानस गायब झाले, नऊ नऊ तास बसवले जाते पण उत्तर दिले जात नाही. शिवसेनेने फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही पैसे दिलेले, चांदीच्या विटा दिलेल्या, कुठे गेले सगळे, असा सवाल त्यांनी केला.
शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललेल्यांना तडीपार करू या
हिंदुत्वाचा गैरवापर शिवसेना संपवण्यासाठी केला जात आहे, अशा प्रकारे शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलललेल्यांना तडीपार करूयात, असे ठाकरे म्हणाले. अयोध्येत राम मंदिरात दर्शनाला जाणाऱ्या साधुसंतांची लंगोटही तपासली जाते आणि दुसरीकडे तिथले पैसे गायब केले जात आहेत. हिंदू म्हणून घ्यायची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असा घणाघात ठाकरेंनी केला.
अन्यायाची लंका जाळून खाक करू
तुम्ही आमचा आज पक्ष चोरला असेल, आमच्याकडचं प्रभू श्रीरामांचं धनुष्य चोरलं असेल, पण आज आमच्या हातात हनुमानाने ज्या मशालीने लंका जाळली होती ती मशाल आमच्या हाती आहे. तुमच्या अन्यायाची लंका आम्ही जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाहीत, असा निर्धार करताना ठाकरे यांनी अयोध्या चोरी प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. नाहीतर चार दिवसांत तपास केला जाईल आणि क्लीन चीट दिली जाईल. देशातील तमाम हिंदूत्ववादींना विनंती करतोय, जागे व्हा. आज हिंदूंना संमोहित केलं जात आहे. तुमचा गैरफायदा घेतला जात आहे. भोळेपणा सोडा. सर्वांनी आमच्यासोबत रामरक्षा करण्यासाठी रस्त्यावर या, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी संजय राऊत, आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते.
