उद्धव ठाकरे यांचा इशारा
मुंबई : आम्हाला कोणी थापडा मारण्याच्या धमक्या देऊ नयेत, नाही तर अशी एक झापड देऊ की धमक्या देणारे पुन्हा कधी उठणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या आमदारांचे नाव न घेता दिला.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याबाबत केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटले. आमचे शाखाप्रमुख त्यावर बोलतील, अशी बोचरी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.   शिवसेनेतून प्रचंड संताप व्यक्त होऊ लागल्यावर प्रसाद लाड यांनी सारवासारव केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आदर असून त्यांच्या सेनाभवन फोडण्याचा प्रश्नच नाही. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ निघाला, असा खुलासा लाड यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नाव न घेता भाजपचा समाचार घेतला. आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कोणी कौतुक केले की भीती वाटते. एका चित्रपटात तो संवाद आहे ना, ‘‘थप्पड से डर नहीं लगता, प्यार से लगता है.’’ पण अशा थापडा घेत आणि देतच शिवसेनेचा प्रवास झाला आहे. जेवढय़ा खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ. आम्हाला कोणी थापडा मारण्याच्या धमक्या देऊ नयेत, नाहीतर अशी एक झापड देऊ की धमक्या देणारे पुन्हा कधी उठणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

तर काही लोकांना अधूनमधून विनोद करायची फारच हुक्की येते, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी लाड यांच्या विधानाची खिल्ली उडवली. तर भाजपची जी प्रवृत्ती आहे तेच त्यांचे शब्द आहेत. आम्ही गांधीजींच्या विचारांची माणसे आहोत. ते कोणत्या प्रवृत्तीचे आहेत ते सांगायची गरज नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी के ली.

तोडफोड करणे आमची संस्कृती नाही

तोडफोड करणे आमची संस्कृती नाही. कोणाच्या अंगावर आम्ही जात नाही, पण कोणी अंगावर आला तर त्याला सोडतही नाही, असेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भाजप आमदार  प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडू असे विधान केले होते. त्याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता लाड यांच्या  वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले.