मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला भुईसपाट करण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू, असे प्रत्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचा समाचार घेताना दिले. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणारच, असा विश्वासही त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी दसरा मेळावा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुखांची बैठक घेतली. शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या आधी गटप्रमुखांचा मेळावा घेण्याची तयारी सुरू केली असून दसरा मेळाव्याआधी हा मेळावा व्हावा. तसेच या मेळाव्याचे स्वरूप शिबिरासारखे असावे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काही जणांनी शिवसेनेला भुईसपाट करण्याची भाषा केली आहे. त्यांना आपण निवडणुकीत अस्मान दाखवू, अशा शब्दांत ठाकरे यांनी अमित शाह यांच्या विधानाचा समाचार घेतला. शिवसेना बळकट करण्यासाठी आपण नवीन आखणी करत आहोत. त्यासाठी अरिवद सावंत, भास्कर जाधव यांना शिवसेना नेतेपदी नियुक्त करण्यात आले आहे. भास्कर जाधव हे लढवय्ये आहेत. आपल्याला आता लढायचे आहे म्हणूनच त्यांची नेतेपदी नियुक्ती केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. हा संघर्षांचा काळ आहे. शिवसेना संपवायला काहीजण निघाले आहेत. निष्ठा ही कितीही बोली लावली तरी विकली जाऊ शकत नाही. नासलेल्या लोकांपेक्षा मूठभर निष्ठावंत कधीही बरे, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

मला मुख्यमंत्रीपदाचा मोह असता तर ते मी क्षणभरात सोडले नसते. माझ्याकडे तेव्हाही ३० ते ४० आमदार होते. त्यांना डांबून ठेवले असते. कोलकाता, राजस्थानला फिरवून आणले असते. पण तो माझा स्वभाव नाही. त्यामुळे सर्वाना सांगितलं की, दरवाजा उघडा आहे. राहायचे असेल तर निष्ठेने राहा नसेल तर तिकडे जा. आता माझ्यासोबत निष्ठावंत कडवट शिवसैनिक आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray s reply to amit shah over targeting shiv sena zws
First published on: 07-09-2022 at 04:59 IST