दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच मला स्पष्टपणे सांगितले होते. त्यांच्या आदेशानुसारच मी निवडणुकीची तयारी सुरू केली होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी गुरुवारी केला. आता या मतदारसंघातून कोणाचीही उमेदवारी अद्यापि निश्चित केली नसल्याचे उद्धव यांनी बुधवारी आपल्याला सांगितले आहे, पण त्यांनी उमेदवारी दिली नाही तरीही शेवटच्या श्वासापर्यंत मी शिवसेनेशीच एकनिष्ठ राहीन, असेही जोशी यांनी सांगितले.
दक्षिण-मध्य मुंबई हा मुंबईतला राजकीयदृष्टय़ा अत्यंत कठीण असा लोकसभा मतदारसंघ आहे. खरे म्हणजे मी निवडणूक लढविण्याचा या वेळी विचारही केला नव्हता. परंतु उद्धव ठाकरे यांनीच परदेशात जाण्यापूर्वी बोलावून येथून तुम्हीच निवडणूक लढवली पाहिजे, असे सांगितले म्हणून मी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन या मतदारसंघावर कोणत्याही परिस्थितीत भगवा फडकवायचाच या जिद्दीने काम सुरू केले होते आणि अचानक ऐन गणेशोत्सवात स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांची होर्डिग्ज व बॅनर झळकू लागले. पक्षाचा मी शिस्तबद्ध सैनिक असल्यामुळे उद्धव परदेशातून येण्याची वाट पाहिली आणि ते आल्यावर त्यांच्याकडे वेळ मागून हे सारे नेमके काय आहे याची विचारणा केली, असे मनोहर जोशी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
राहुल शेवाळे दादरमध्ये फिरत होते. त्यांना काही मंडळांनी पैसे दिले. काही पदाधिकारीही त्यांच्याबरोबर होते. अशा प्रकारे परस्पर दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन स्वत:ची होर्डिग्ज लावण्याचा प्रकार गेल्या ४५ वर्षांत माझ्या तरी पाहण्यात आलेला नाही. शिवसैनिकांमध्येही याबाबत नाराजी असून ती योग्यच आहे, कारण हे सारे पक्षशिस्तीत बसणारे नाही. दादरच्या या मतदारसंघातून १९६८ पासून मी निवडणूक लढवीत असून आजपर्यंत दादरमधील प्रत्येक फलकावर माझा उल्लेख असायचा आणि बाहेरचा कोणीतरी येऊन माझा उल्लेखही न करता केवळ स्वत:चीच पोस्टरबाजी करतो, हे सारे अस्वस्थ करणारे होते. त्यामुळे माझी अस्वस्थता उद्धव यांची भेट घेऊन मी व्यक्त केली. तुम्ही उमेदवारी जाहीर केली का, असा प्रश्न उद्धव यांना विचारला असता त्यांनी ‘नाही’, असे सांगितले. तसेच लोकसभा उमेदवार एकाच वेळी जाहीर करणार असल्याचे सांगितल्याचे मनोहर जोशी म्हणाले.
पक्षशिस्तीचा प्रश्न उपस्थित करीत शेवाळे यांच्या बॅनरबाजीबाबत विचारले असता, राहुल शेवाळे यांनी माझ्याकडूनच परवानगी घेतली, असे उद्धव यांनी सांगितल्यामुळे पुढे बोलण्याचा काही प्रश्नच नव्हता, असेही ते म्हणाले.