शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शननिवारी चारकोप विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी कांदिवली पश्चिम विभाग क्रमांक २ येथे कार्यकर्त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी चारकोप येथील मालवणी महोत्सवात सहभाग घेतला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांना ‘बॉम्बे’ नावावर भाष्य करताना मोठी घोषणा केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटले ते जाणून घेऊयात.
मुंबईची हवा घातक होत चालली आहे-उद्धव ठाकरे
मुंबईची हवा आता घातक होत चालली आहे. मुंबईत प्रदूषण वाढलं आहे. आपले राज्यकर्ते अकलेचे तारे तोडत आहेत. इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यानंतर धुळीचे लोट उडाले त्यामुळे प्रदूषण होतं आहे म्हणत आहेत. पण हे लोट त्याचे नाहीत मागचे दोन ते चार वर्षे मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार झाला, महाराष्ट्रात भ्रष्टाचार झाला आहे त्याचा उद्रेक झाला आहे. मला तुम्हा सगळ्या उपस्थितांचा अभिमान वाटतो. भगवा एकच, शिवाय आता दोन्ही भगवे एकत्र झाले आहेत.
आम्ही जे मराठी महापौर बसवले ते हिंदू नव्हते का?
आत्ताच्या राज्यकर्त्यांपैकी एका नेत्याला विचारलं गेलं की मुंबईचा महापौर मराठी होणार का? तो म्हणाला मुंबईचा महापौर हिंदू होणार. मग आजपर्यंत जे काही मराठी महापौर केले ते काही हिंदू नव्हते का? आम्ही अस्सल मराठीप्रेमी हिंदू आहोत. आम्ही दोघं जे काही तुम्हाला सांगत आहोत ते हेच आहे की मुंबईचं मराठीपण हे लोक हळूवारपणे मारत चालले आहेत. आम्ही हिंदू आहोतच पण त्यासाठी आम्ही महाराष्ट्राचा बळी जाऊ देणार नाही. देशाचं रक्षण करणारं जे गाणं आहे ना दिल्लीचं तख्त राखतो महाराष्ट्र माझा. तसा दिल्लीशी एकनिष्ठ असणारा आमचा महाराष्ट्र आहे. हिंदीचा आम्हाला द्वेष नाहीये, पण सक्ती का करता. जिकडे बॉम्बे असेल तिकडे आम्ही मुंबई करू अशी घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
जिथे जिथे बॉम्बे आहे त्याचं मुंबई करणार-उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मधे त्यांचे नेते आले होते ते म्हणाले आयआयटी बॉम्बेमधे बॉम्बे आहे तेच बरं आहे. आमच्याकडून ते राहिलं करायचं पण आज तुम्हाला सांगतो जिथे जिथे बॉम्बे असेल तिथे मुंबई करु. कुठल्या शाळेचं नावही बदलायचं तर बदलू. कारण पंतप्रधान जे बोलत आहेत कुठल्यातरी मॅकेलेची शिक्षणपद्धती आहे त्याने गुलामीच्या मानसिकतेत ढकललं. हे मॅकेलेने नाही केलं तुमच्या मुंबईला बॉम्बे म्हणणाऱ्या ज्या नेत्यांच्या अवलादी आहेत त्यांनी हे केलं आहे अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली. याविरोधातच आपल्याला लढा द्यायचा आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबईकरांच्या प्रेमात कुणी मिठाचा खडा टाकणार असेल तर..: उद्धव ठाकरे
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘मुंबईकरांच्या प्रेमात हे मिठाचा खडा टाकत असतील तर त्यांना बाजूला करण्या शिवाय राहणार नाही. अ मराठी मुस्लिमही म्हणत आहेत की त्यांना मुंबई शिवसेनेच्या ताब्यात हवी आहे. पक्ष चोरू शकतात पण आपले प्रेम चोरू शकत नाहीत. एक मालवणी जत्रोत्सव गिरगावमध्ये केला पाहिजे. कोंबडी वडे गिरगाव चौपाटीवर झाले पाहिजे. कधीही निवडणूक होईल. पंतप्रधान सांगतात ऑन नेशन ऑन इलेक्शन आम्ही सांगतो ऑन नाव ऑन मत.’ असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
