मुंबई : दहिसर आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघामधील शिवसेनेच्या (ठाकरे) माजी नगरसेवकांमध्ये नाराजी वाढली आहे. येथील एकापाठोपाठ एक माजी नगरसेवक ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करीत आहेत. २०१७ च्या निवडणुकीत १० नगरसेवक निवडून आल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला ठरला होता. मात्र आता दहिसर, मागाठाणेत ठाकरे यांच्या शिवसेनेला भगदाड पडले आहे. त्यातच माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी उघड नाराजी व्यक्त केल्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.

विभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेने २०१७ च्या महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. या दोन्ही मतदारसंघात मिळून तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेचे १० नगरसेवक निवडून आले होते. वरळी, शिवडीपाठोपाठ दहिसर, मागाठाणेमध्ये शिवसेनेने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली होती. शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर या दोन मतदारसंघातील एकापाठोपाठ एक नगरसेवकांनी ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

‘भूमिका मांडली, उत्तरानंतर पुढील निर्णय’

माजी नगरसेविका आणि दहिसर विधानसभा संघटक तेजस्वी घोसाळकर यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना चर्चेसाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी पाचारण केले होते. ‘ठाकरे यांच्याकडे आपली भूमिका मांडली असून त्यांच्याकडून उत्तर मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेणार ’, असे घोसाळकर यांनी स्पष्ट केले. पक्ष सोडणारच नाही हे त्यांनी जाहीर केलेले नाही. यामुळे त्या ठाकरे यांचा पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकरे गटात १० पैकी तीन नगरसेवक

दहिसर, मागाठाणेमधून २०१७ च्या पालिका निवडणुकीत शीतल म्हात्रे, बाळकृष्ण ब्रीद, हर्षद कारकर, रिद्धी खुरसुंगे, संध्या दोशी, संजय घाडी, गीता सिंघण, तेजस्वी घोसाळकर, माधुरी भोईर, सुजाता पाटेकर असे १० नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सध्या तेजस्वी घोसाळकर, माधुरी भोईर आणि सुजाता पाटेकर या तीनच माजी नगरसेविका ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. बाकी सर्व सात माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.