मुंबई: शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला सहा खासदारांनी वेगळी वाट स्वीकारल्याने ठाकरे गटात संतप्त भावना आहे. पक्षातील फुटीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणती भूमिका मांडतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दीच्या पार्श्वभूमिवर शिवेसेनेचा ६० वा वर्धापनदिन षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जाणार आहे. खासदारांच्या बंडानंतरही ठाकरे गटाने मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे. या मेळाव्यात बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन केले जाणार असून मोठ्या संख्येने शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आले आहे.
आमदारांच्या बंडखोरीनंतरही उद्धव ठाकरे यांनी जाणऱ्यांना खुशाल जाण्यास सांगितले होते. त्यानंतरही माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी साथ सोडल्यानंतरही त्यांची ही भूमिका कायम होती. मात्र पक्ष फुटल्यानंतरही मशाल चिन्हावर निवडून आलेले खासदार फुटणे हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राहिलेले खासदार, आमदार तसेच मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना फुटू नयेत म्हणून उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार याबाबत उत्सुकता आहे.
ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक
सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश करण्याच्या हालचाली सुरु झाल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पाटील यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे हे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घेणार आहेत.
