मुंबई: राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या संख्याबळा (९) एवढे खासदार निवडून आणणाऱ्या शिवसेना ठाकरे पक्षाने (९) लोकसभा निवडणूकीत भाजपला समांतर ताकदीचा प्रत्यय दिला होता. या नऊ पैकी चार खासदारांना आपल्याकडे वळविण्यात शिवसेना शिंदे पक्षाला यश आल्याने ठाकरे पक्षाची ही ताकद कमकुवत झाली. दोन खासदार आजही तळ्यात मळ्यात आहेत. आज सकाळी अकरा वाजता संसदीय सदस्यांची बैठक आहे. तेथील उपस्थिती वरून कळणार आहे की ठाकरे यांच्या बरोबर किती खासदार आहेत आणि शिंदे सेनेत किती जाणार आहेत. अनुपस्थित राहिल्यास खासदारांचे पद धोक्यात येऊ शकते मात्र ठाकरे पक्षातील या पडझड मुळे पक्षात अस्वस्थता वाढली आहे.

केंद्रातील भाजपला पाठिंबा देणाऱ्या खासदारांची संख्या वाढविल्याने शिंदे सेनेला या कामगिरीचे बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस शिंदेची शिवसेना प्रबळ होत असल्याने या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. येत्या काळात राज्यातील काही आमदार, नगरसेवक फुटणार चर्चेने ठाकरे पक्षातील अस्वस्थता वाढली आहे.

चार वर्षापूर्वी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेना फोडणाऱ्या शिंदे यांचा फोडाफोडीच्या या राजकरणावरील आत्मविश्वास वाढला आहे. केंद्रातील भाजप सरकारला आगामी अधिवेशनात काही अनुकूल विधेयक मंजूर करण्यासाठी जास्त (दोन तृतीअंश) खासदारांची गरज आहे. एनडीएतील मित्रपक्ष भाजपवरील निष्ठा दाखवण्यासाठी विरोधकांचे खासदार फोडण्याचे काम करीत आहेत. पश्चिम बंगाल मधील तृणमूल काँग्रेसचे वीस खासदारांना वेगळा गट स्थापन करण्याची परवानगी दिल्याने भाजपची संसदेतील ताकद वाढली आहे.

राज्यातील शिंदे पक्षाने भाजपसाठी ठाकरे पक्षाचे सहा खासदार फोडले आहेत. सहा खासदार सत्ताधारी एनडीए सोबत गेल्याने त्यांच्या मतदार संघातील विरोधी पक्षांचे आमदार गळाला लावण्याचे काम सुरु झाले आहे. या आमदारांची सध्या सत्ताधारी महायुतीला गरज नसली तरी ठाकरे पक्ष खिळखिळा करणे हे एकमेव काम केले जात आहे. ठाकरे पक्षाचे राज्यात केवळ १६ आमदार आहेत. त्यातील सात आमदार शिंदे पक्षात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. विरोधी पक्षात राहून मतदार संघातील विकास कामे होत नाही, असा कांगावा खासदारांप्रमाणे या आमदारांनी सुरु केला आहे.

खासदार, आमदार फुटीपर्यंत सुरु असलेले हे राजकारण आता मुंबई पालिकेतील ठाकरे पक्षाचे नगरसेवक फोडण्या पर्यंत आले आहे. तसा इशारा शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिला आहे. शिंदे पक्ष मजबूत करणे हा एकमेव कार्यक्रम आखण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ठाकरे पक्षाचे नगरसेवक अथवा सदस्य जास्त असल्यास ते शिंदे पक्षात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात शिंदे यांची शिवसेना मजबूत करण्यासाठी पक्ष फोडण्याचे हे काम सुरु राहणार,असल्याचे शिंदे सेनेतील एका नेत्याने सांगितले.