मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलाविलेल्या बैठकीला नऊ पैकी केवळ चारच खासदार उपस्थित राहिल्याने ऑपरेशन टायगर आजही सुरू असल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. का ही चर्चा सुरू झाली आहे. शिंदे सेनेला ऑपरेशन टायगर का आवश्यक वाटते.सविस्तर वाचा

पश्चिम बंगाल मधील तृणमूल काँग्रेसच्या वीस खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याने राज्यात शिवसेना शिंदे पक्ष ठाकरे पक्षाचे खासदार फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवित असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना  प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवर राज्यातील नऊ खासदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मुबईतील तीन आणि नाशिक मधील एक असे केवळ चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. पाच खासदारांनी ऑनलाईन बैठकीला उपस्थिती लावल्याचे सांगितले जात आहे.  पाच खासदारांच्या प्रत्यक्ष अनुपस्थितीमुळे ऑपरेशन टायगरचा संशयकल्लोळ कायम राहिला आहे.

राज्यात शिवसेना ठाकरे पक्षाचे एकूण नऊ खासदार आहेत. यातील सात खासदार फुटणार असल्याची चर्चा गेली अनेक दिवस सुरु आहे. शिवसेना स्थापनेला १९ जून रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकसंध शिवसेना फोडल्याच्या घटनेला २२ जून रोजी चार वर्षे होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे राजकीय वतूर्ळात खळबळ माजली आहे. केंद्रातील भाजप सरकार नारीशक्ती वंदन अधिनियम (विधेयक) मंजुर करण्यासाठी दोन तृतीअंश खासदारांची जुळवाजुळव करीत आहे. त्यासाठी विरोधकांचे खासदार फोडण्यासाठी ताकद दिली जात आहे.  तृणमूल काँग्रेसच्या वीस खासदारांनी संसदेत वेगळी चूल मांडली आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे सात खासदार आहेत. ठाकरे पक्षाचे आणखी नऊ पैकी सात खासदार फोडून भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या खासदारांची संख्या वाढवण्याचा शिंदे पक्षाची मार्चेबांधणी आहे.

त्याासाठी दिल्लीत स्नेहभोजनाला ठाकरे पक्षाच्या खासदारांची उपस्थिती चर्चेची ठरली आहे. खासदार फुटीच्या भितीेने उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व खासदारांना रविवारी  मुंबईत मातोश्रीवर बैठकीसाठी बोलविले होते पण या बैठकीला मुंबईतील अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय दिना बामा पाटील, आणि नाशिकचे राजाभाऊ वाजे प्रत्यक्षात उपस्थित होते. राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे नेते संजय राऊत हे तर उपस्थित होते. इतर पाच खासदार उपस्थित न राहिल्याने पुन्हा ऑपरेशन टायगरच्या चर्चेला उधाण आले आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा विधानपरिषदेची निवडणूक लढवत आहे. त्यामुळे ते  निवडणुकीसाठी लागणारे स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य सख्याबळ जुळवाजुळव करीत आहेत. त्यांनी ऑनलाईन या बैठकीत सहभाग घेतला. आपण फुटणार असल्याची चर्चा  निवडणून आल्या पासून असल्याचे त्यांनी सांगितले.

परभणीचे खासदार संजय जाधव फोनवरुन उपस्थित होते. यवतमाल वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या मुलीचे लग्न आहे. त्यामुळे ते लग्नकार्यात व्यस्त आहेत. ते ही ऑनलाईन उपस्थित होते असे सांगण्यात आले. शिर्डीचे खासदार  भाऊसाहेब वाकचौरे सकाळ पासून संर्पकात नव्हते. त्यामुळे दिवसभर त्यांच्या नाॅट रिचेबलची चर्चा रंगली होती. बैठकीला उपस्थित न राहण्यामागे वाघचौरे यांनी वैद्यकिय कारण दिले आहे. उस्मान धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मुलाची प्रकृती ठिक नसल्याने ते मुंबईत उपस्थित राहिले नाहीत पण ते ऑनलाईन उप्सथित होते असे बैठकीनंतर सजय राऊत यांनी सांगितले. या बैठकीत पक्षाची एकजूट,आगामी राजकीय रणनिती  खासदारांशी थेट संवाद यावर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांशी संवाद साधत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर पक्षाची ताकद कायम राखणे आणि विरोधकांकडून सुरू असलेला अपप्रचार ‘ऑपरेशन टायगर’ला उत्तर देणे, हा या बैठकीमागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. ऑपरेशन टायगरच्या चर्चेत तथ्य नाही. ही चर्चा लोकसभा निवडणूक झाल्यापासून होत आहे. पक्षप्रमुखांनी बैठक आयोजित करु नये का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. ही दर महिन्याला होणारी बैठक होती. पुढील बैठकीत सर्व खासदार उपस्थित राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाकरे यांच्या बरोबर असणारे आम्ही सर्वजण वाघ आहोत. ते कुठेही जाणार नाहीत पण काही दिवसात आम्ही ऑपरेशन लांडगा राबविणार आहोत, असे राऊत यांनी सांगितले.